जिप सीईओ विवेक गायकवाड यांची वसमत येथे हरिद्रा संशोधन केंद्र व पंचायत समितीला भेटविकास कामे, हळद संशोधन प्रकल्प व घरकुल योजनेचा घेतला आढावा

  जिप सीईओ  विवेक गायकवाड यांची वसमत येथे हरिद्रा संशोधन केंद्र व पंचायत समितीला भेट
विकास कामे, हळद संशोधन प्रकल्प व घरकुल योजनेचा घेतला  आढावा

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
हिंगोली दि. ११ : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी शुक्रवारी वसमत येथील मा. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन केंद्र तसेच पंचायत समिती, वसमत येथे भेट देऊन विविध विकासकामांची आणि योजनांच्या अंमलबजावणीची सविस्तर पाहणी केली.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी गायकवाड यांनी हरिद्रा संशोधन केंद्रामध्ये सुरू असलेल्या हळद संशोधन प्रकल्पांची माहिती घेतली. हळद उत्पादनाची गुणवत्ता वाढविणे, सुधारित वाणांचा विकास, आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा वापर तसेच शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या प्रशिक्षण कार्यक्रमांचा आढावा घेत त्यांनी संशोधन कार्य अधिक प्रभावीपणे राबविण्याबाबत सूचना दिल्या. शेतकऱ्यांपर्यंत संशोधनाचा लाभ अधिकाधिक पोहोचावा, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
त्यानंतर पंचायत समिती कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत विविध विकासकामांचा सखोल आढावा घेण्यात आला. ग्रामीण भागात सुरू असलेल्या मूलभूत सुविधा, पायाभूत विकासकामे आणि शासनाच्या विविध योजनांच्या प्रगतीचा त्यांनी तपशीलवार आढावा घेतला.
बैठकीत पंतप्रधान आवास योजना – ग्रामीण अंतर्गत मंजूर घरकुलांची सद्यस्थिती, सुरू असलेली बांधकामे, पूर्ण झालेली घरे तसेच प्रलंबित प्रकरणांचा स्वतंत्रपणे आढावा घेण्यात आला. लाभार्थ्यांना वेळेत घरे उपलब्ध करून देण्यासाठी सर्व मंजूर घरकुले निर्धारित कालावधीत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. कामांमध्ये कोणताही विलंब होणार नाही, यासाठी सातत्याने पाठपुरावा करून गुणवत्तापूर्ण कामे पूर्ण करण्यावर त्यांनी भर दिला.
"शासनाच्या सर्व विकास योजना प्रभावीपणे व वेळेत राबवून त्याचा थेट लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविणे ही प्रशासनाची जबाबदारी असून, त्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे," असे निर्देशही मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी यावेळी दिले.
या भेटीदरम्यान गटविकास अधिकारी प्रफुल तोटेवाड, जिल्हा कृषी अधिकारी अतुल वायसे तसेच पंचायत समिती व हरिद्रा संशोधन केंद्रातील संबंधित अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم