हिंगोलीत वंचित बहुजन आघाडीची उद्या महत्त्वपूर्ण जिल्हास्तरीय बैठक; निवडणूक पूर्वतयारीसह नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा होणार सत्कार
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
हिंगोली, दि. ११ जुलै : आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने वंचित बहुजन आघाडी, हिंगोली जिल्हा कार्यकारिणी व जिल्हा समन्वयन समिती यांच्या वतीने रविवार, दि. १२ जुलै २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता शासकीय विश्रामगृह, हिंगोली येथे विशेष जिल्हास्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
या बैठकीस हिंगोली, कळमनुरी, सेनगाव, औंढा नागनाथ आणि वसमत या पाचही तालुक्यांतील सर्व जिल्हा व तालुका पदाधिकारी, आजी-माजी पदाधिकारी, माजी उमेदवार, तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष, सर्कल पदाधिकारी, कार्यकर्ते व हितचिंतकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
बैठकीमध्ये आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठीची रणनीती निश्चित करणे, विस्तारित जिल्हा व तालुका कार्यकारिणीसाठी नावे निश्चित करणे, जिल्हा, तालुका व सर्कल स्तरावर पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी नियोजन करणे, गावागावांत पक्षाचा विस्तार करण्यासाठी कृती आराखडा तयार करणे तसेच हिंगोली जिल्ह्यातील नवनियुक्त जिल्हा व तालुका पदाधिकाऱ्यांचा जाहीर सत्कार व सन्मान करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाला मा. ज्ञानेश्वर सुलताने (समन्वयक, वंचित बहुजन आघाडी, हिंगोली) तसेच मा. प्रा. सुरेश सिरसाट (समन्वयक, वंचित बहुजन आघाडी, हिंगोली) हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
निवडणुका लक्षात घेता ही बैठक अत्यंत महत्त्वाची असून सर्व नवनियुक्त पदाधिकारी, आजी-माजी पदाधिकारी, माजी उमेदवार आणि सक्रिय कार्यकर्त्यांनी वेळेवर उपस्थित राहणे आवश्यक असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.
"चलो हिंगोली... विचार पेटवूया, सत्ता बदलूया!" या घोषवाक्यासह पक्ष संघटना अधिक सक्षम करण्याचा निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात येणार असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी पक्षाची दिशा व कृती आराखडा निश्चित होणार असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडी, हिंगोली जिल्हा कार्यकारिणी व जिल्हा समन्वयन समिती यांच्या वतीने देण्यात आली आहे.
إرسال تعليق