शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या ई-केवायसीसाठी पैसे घेतल्यास 'आपले सरकार सेवा केंद्र' होणार बंद : तहसीलदार श्रीकांत भुजबळ यांचा इशारा
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
31 जुलै 2026
हिंगोली, प्रतिनिधी : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांची आधार ई-केवायसी प्रक्रिया पूर्णपणे मोफत करण्यात येणार असून, यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारू नये, असे स्पष्ट निर्देश शासनाने दिले आहेत. मात्र, काही आपले सरकार सेवा केंद्र (ASSK) चालकांकडून शेतकऱ्यांकडून ई-केवायसीसाठी पैसे मागितले जात असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर तहसीलदार श्रीकांत भुजबळ यांनी संबंधित केंद्रचालकांना कडक इशारा दिला आहे.
यासंदर्भात MahaIT Corporation Ltd. ने राज्यातील सर्व आपले सरकार सेवा केंद्र चालकांना तातडीच्या सूचना जारी केल्या आहेत. शासनाच्या निर्देशानुसार या योजनेअंतर्गत ई-केवायसीची सेवा पूर्णपणे निःशुल्क असून, शेतकऱ्यांकडून कोणतेही शुल्क आकारण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.
तहसीलदार श्रीकांत भुजबळ यांनी सांगितले की, एखाद्या सेवा केंद्र चालकाने ई-केवायसीसाठी शेतकऱ्यांकडून पैसे घेतल्याचे सिद्ध झाल्यास संबंधितावर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल. तसेच संबंधित आपले सरकार सेवा केंद्राचे कामकाज निलंबित करण्यात येईल किंवा आवश्यकतेनुसार ते कायमस्वरूपी बंद करण्याचीही कारवाई केली जाऊ शकते.
शेतकरी हा शासनाच्या कल्याणकारी योजनेचा लाभार्थी असून त्याला कोणत्याही प्रकारचा आर्थिक भुर्दंड बसू नये, यासाठी सर्व केंद्रचालकांनी शासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहनही तहसीलदार भुजबळ यांनी केले आहे. पात्र शेतकऱ्यांना कोणतीही अडचण न येता ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून देण्याबरोबरच त्यांना योग्य, पारदर्शक आणि निःशुल्क सेवा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी सेवा केंद्र चालकांची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
प्रशासनाने शेतकऱ्यांना देखील आवाहन केले आहे की, ई-केवायसीसाठी कोणत्याही सेवा केंद्राकडून शुल्काची मागणी करण्यात आल्यास त्याची त्वरित माहिती संबंधित तहसील कार्यालय किंवा प्रशासनाकडे द्यावी, जेणेकरून दोषींवर तातडीने कारवाई करता येईल.
टिप्पणी पोस्ट करा