हिंगोली शहर पोलिसांची धडक कारवाई : गावठी पिस्टल व दोन जिवंत काडतुसे जप्त; रेकॉर्डवरील आरोपी अटकेत
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
हिंगोली, दि. १ ऑगस्ट : हिंगोली शहरात गावठी पिस्टल व जिवंत काडतुसे बाळगून नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या रेकॉर्डवरील आरोपीवर हिंगोली शहर पोलिसांनी धडक कारवाई करत त्याला अटक केली आहे. आरोपीच्या ताब्यातून एक गावठी पिस्टल व दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिनांक ३१ जुलै २०२६ रोजी हिंगोली शहर पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, करण बालाजी बांगर (वय २४), रा. वंजारवाडा, हिंगोली, ह. मु. खटकाळी मंदिराजवळ, हिंगोली हा गावठी पिस्टल व जिवंत काडतुसे बाळगून शहरातील सार्वजनिक ठिकाणी फिरत असून नागरिकांमध्ये भीती व दहशतीचे वातावरण निर्माण करत आहे.
या खात्रीशीर माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक देवेंद्रसिंह ठाकुर यांच्या आदेशानुसार पोलीस उपनिरीक्षक गजानन साखरे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने पंचांसमक्ष छापा टाकला. औंढा नाका रोडजवळील स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावर आरोपीला ताब्यात घेण्यात आले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून एक गावठी पिस्टल व दोन जिवंत काडतुसे आढळून आली. पोलिसांनी तत्काळ शस्त्र व काडतुसे जप्त करून आरोपीला अटक केली.
या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक गजानन साखरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हिंगोली शहर पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक मसके करत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. श्रेणिक लोढा, अपर पोलीस अधीक्षक कमलेश मीना आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत पोलीस निरीक्षक देवेंद्रसिंह ठाकुर, पोलीस उपनिरीक्षक गजानन साखरे, पोलीस हवालदार सुनील अंभोरे तसेच पोलीस शिपाई दिलीप लेकुळे, संतोष कऱ्हे, आकाश बोथीकर, भूषण जोगे आणि बाबासाहेब कांबळे यांनी सहभाग घेतला.
आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी हिंगोली शहरात अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांविरुद्ध विशेष मोहीम राबवून कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक देवेंद्रसिंह ठाकुर यांनी दिली.
टिप्पणी पोस्ट करा