कळमनुरी गोळीबार प्रकरण : आठ आरोपींना न्यायालयाकडून सहा दिवसांची पोलीस कोठडीफरार आरोपीच्या शोध सुरू

कळमनुरी गोळीबार प्रकरणात  आठ आरोपींना  न्यायालयाकडून सहा दिवसांची पोलीस कोठडी
फरार आरोपीच्या शोध सुरू 

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
18 जुलै 2026 
कळमनुरी शहरातील  जुना बसस्थानक परिसरात १५ जुलै रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास झालेल्या थरारक गोळीबार प्रकरणाचा तपास पोलिसांनी वेगाने सुरू ठेवला असून या प्रकरणातील आठ आरोपींना अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या आरोपींना शुक्रवारी (१७ जुलै) कळमनुरी न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना २२ जुलैपर्यंत सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, फरार आरोपींच्या अटकेसाठी दोन विशेष पथके विविध ठिकाणी शोधमोहीम राबवत आहेत.
या गोळीबारात लुकमान सिद्दिकी या युवकाचा मृत्यू झाला असून अन्य चार जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे कळमनुरी शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
या प्रकरणी कळमनुरी पोलीस ठाण्यात १६ आरोपींविरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न तसेच इतर विविध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरुवातीला सात आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यानंतर १६ जुलैच्या रात्री परभणी येथून आणखी एका आरोपीला ताब्यात घेण्यात आल्याने अटक आरोपींची संख्या आठवर पोहोचली आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये शेख असिफ उर्फ शेख खालील शेख फारुक स. रहीम, मुस्तकीम शेख गणी, इमरान खान दाऊद खान, सिबगत खसलत नाईक, शेख शहबाज शेख अश्फाक, साहिल नाईक शाईन नाईक आणि फहीम नाईक तलहा नाईक यांचा समावेश आहे.
तपासादरम्यान पोलिसांनी एक स्कॉर्पिओ, एक अन्य चारचाकी वाहन, दोन मोटारसायकली आणि एक खंजीर जप्त केला आहे. या वाहनांचा आणि शस्त्रांचा गुन्ह्यात नेमका कसा वापर झाला, याबाबत पोलीस सखोल तपास करत आहेत. तसेच तपासात आणखी काही आरोपींचा सहभाग समोर येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
फरार आरोपींना अटक करण्यासाठी दोन विशेष पथके तयार करण्यात आली असून विविध ठिकाणी छापेमारी आणि शोधमोहीम सुरू आहे.
"उर्वरित आरोपींनाही लवकरच अटक करण्यात येईल. तपास वेगाने सुरू असून सर्व बाबींची सखोल चौकशी केली जात आहे," अशी माहिती पोलीस निरीक्षक जमीर नाईक यांनी दिली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने