शासकीय कर्तव्यात अडथळा; पोलिसावर हल्ला, दोघे ताब्यात

शासकीय कर्तव्यात अडथळा; पोलिसावर हल्ला, दोघे ताब्यात

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
१३ जुलै 2026
. हिंगोली) : सेनगाव पोलीस ठाण्याच्या पथकावर कारवाईदरम्यान हल्ला करून शासकीय कर्तव्यात अडथळा आणल्याप्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यापैकी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 12 जुलै 2026 रोजी सायंकाळी सुमारे 5 वाजण्याच्या सुमारास गणेशपूर ते हट्टा जाणाऱ्या रस्त्यावर, गणेशपूरपासून सुमारे 15 किलोमीटर अंतरावर, सेनगाव पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस हवालदार जीवन आनंदराव मस्के (वय 42) हे सहकाऱ्यांसह एमएच-22-एएन-2291 क्रमांकाच्या पिकअप वाहनावर चालानाची कारवाई करीत होते.
यावेळी गजानन वामन चव्हाण, सुदाम वसराम चव्हाण (वय 47), राजेश सुभाष चव्हाण (वय 26) व वामन भुरा चव्हाण (सर्व रा. गणेशनगर तांडा, ता. जिंतूर, जि. परभणी) यांनी संगनमत करून शासकीय कर्तव्य बजावत असलेल्या पोलिसांना धाक दाखवत कारवाईत अडथळा आणला. फिर्यादी पोलीस कर्मचाऱ्याला थपडा व बुक्क्यांनी मारहाण केली तसेच दगडाने हल्ला करून जखमी केले. यानंतर शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
या प्रकरणी सेनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. 384/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 132, 121(1), 221, 115(2), 352, 351(2), 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्याची नोंद पोहेकॉ. जी. एस. पाचपुते यांनी केली असून, तपास पोलीस उपनिरीक्षक आर. व्ही. खंदारे करीत आहेत. दरम्यान, आरोपी क्रमांक 2 सुदाम वसराम चव्हाण व आरोपी क्रमांक 3 राजेश सुभाष चव्हाण यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.
घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव व पोलीस उपनिरीक्षक खंदारे यांनी भेट देऊन पाहणी केली. पुढील तपास सेनगाव पोलीस ठाण्याकडून सुरू आहे.

Post a Comment

أحدث أقدم