चिंचाळा सहकारी संस्थेतील कथित अनियमिततेची चौकशी डॉ. रमेश शिंदे

चिंचाळा सहकारी संस्थेतील कथित अनियमिततेची चौकशी
डॉ. रमेश   शिंदे 
महाराष्ट्रात 24 न्यूज नेटवर्क 
12 ऑगस्ट 2026
हिंगोली : तालुक्यातील मौजे चिंचाळा येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेत झालेल्या कथित आर्थिक व प्रशासकीय अनियमिततेच्या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, हिंगोली यांनी दिले आहेत. या आदेशामुळे संस्थेतील व्यवहारांची आता सखोल तपासणी होणार असून, चौकशी अहवालाकडे सभासदांसह परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रमेश विठ्ठलराव शिंदे यांनी ३१ जुलै रोजी सहाय्यक निबंधक कार्यालयाकडे लेखी तक्रार दाखल केली होती. संस्थेतील आर्थिक व्यवहार, अभिलेखांची नोंद व देखभाल, नियमबाह्य सभासद नोंदणी तसेच संचालक पदाच्या नियुक्तीबाबत त्यांनी आक्षेप नोंदविले आहेत. तक्रारीसोबत त्यांनी विविध आठ मुद्दे नमूद करून त्यांची सखोल चौकशी करण्याची मागणी केली होती.
तीन सदस्यीय चौकशी पथकाची नियुक्ती
तक्रारीची दखल घेत सहाय्यक निबंधक माधव यादव यांनी सहकार अधिकारी श्रेणी-१ व्ही. ए. गिते यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय चौकशी पथकाची नियुक्ती केली आहे. या पथकात मुख्य लिपिक एन. वाय. पठाण आणि सहाय्यक सहकार अधिकारी एस. एस. ठाकरे यांचा समावेश आहे.
चौकशी पथकाला तक्रार अर्जात नमूद करण्यात आलेल्या सर्व आठ मुद्द्यांची सखोल तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यासोबतच संस्थेचे संबंधित सर्व अभिलेख, कागदपत्रे तसेच बँक खात्यांतील व्यवहारांची तपासणी करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
आठ दिवसांत अनुपालन अहवाल
चौकशी पूर्ण करून त्याचा अनुपालन अहवाल आठ दिवसांच्या आत सहाय्यक निबंधक कार्यालयात सादर करण्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे आता चौकशी पथकाकडून संस्थेच्या आर्थिक व्यवहारांसह सभासद नोंदणी, संचालक पदाच्या नियुक्तीशी संबंधित कागदपत्रे आणि इतर अभिलेखांची तपासणी केली जाणार आहे.
चौकशी अहवालानंतर कारवाईकडे लक्ष
चिंचाळा येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेतील कथित अनियमिततेचे प्रकरण सध्या तालुक्यात चर्चेचा विषय ठरले आहे. तक्रारीतील आरोपांमध्ये तथ्य आढळते का, याचा उलगडा चौकशी अहवालातून होणार आहे. चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधित दोषींवर नियमानुसार आवश्यक ती कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
दरम्यान, चौकशी पथकाच्या तपासणीत कोणती माहिती समोर येते आणि तक्रारीतील आठही मुद्द्यांबाबत काय निष्कर्ष निघतो, याकडे सभासद व संबंधितांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

أحدث أقدم