पालकमंत्री नरहरी झिरवाळ आजपासून दोन दिवस हिंगोली दौऱ्यावर
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
हिंगोली दि. 14 राज्याचे अन्न व औषध प्रशासन, विशेष सहाय्य मंत्री तथा हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ हे शुक्रवार, दि. 14 ऑगस्ट 2026 पासून दोन दिवस हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित विविध शासकीय कार्यक्रमांसह पुरस्कार वितरण, जिल्हा ग्रंथालयाचे उद्घाटन, आरोग्य वर्धिनी बैठक, आरोग्यसेवा प्रकल्पाचा शुभारंभ तसेच कृषी विज्ञान केंद्राला भेट आदी कार्यक्रमांना ते उपस्थित राहणार आहेत.
शुक्रवार, दि. 14 ऑगस्ट रोजी रात्री 8 वाजता पालकमंत्री नरहरी झिरवाळ हे नांदेड येथून शासकीय वाहनाने हिंगोलीकडे प्रयाण करतील. रात्री 9.30 वाजता त्यांचे हिंगोली येथील शासकीय विश्रामगृहात आगमन होईल. त्यानंतर त्यांचा वेळ राखीव असून, शासकीय विश्रामगृह येथे त्यांचा मुक्काम राहणार आहे.
शनिवार, दि. 15 ऑगस्ट रोजी सकाळी 9.05 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित भारताच्या 80 व्या स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहण कार्यक्रमास पालकमंत्री झिरवाळ उपस्थित राहतील. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पुरस्कार वितरण कार्यक्रम, जिल्हा ग्रंथालयाचे उद्घाटन तसेच आरोग्य वर्धिनी बैठकीस ते उपस्थित राहणार आहेत.
यानंतर सकाळी 11.30 वाजता खेडेकर सुपर स्पेशालिटी ॲन्ड क्रिटीकल केअरच्या शुभारंभ कार्यक्रमास पालकमंत्री उपस्थित राहतील. दुपारी 12 वाजता शासकीय विश्रामगृह येथे त्यांचा वेळ राखीव ठेवण्यात आला आहे.
दुपारी 1.30 वाजता शिरडशहापूर येथे पालकमंत्री झिरवाळ यांचे शासकीय वाहनाने आगमन होईल. येथे 80 व्या भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित वीर योद्धा परिवार सन्मान समारोहास ते उपस्थित राहतील. कार्यक्रमानंतर शिरडशहापूर येथून ते शासकीय वाहनाने वारंगा फाट्याकडे प्रयाण करतील.
दुपारी 3 वाजता वारंगा फाटा येथे आगमन झाल्यानंतर पालकमंत्री झिरवाळ हे कृषी विज्ञान केंद्रास भेट देणार आहेत. या भेटीनंतर दुपारी 3.30 वाजता वारंगा फाटा येथून शासकीय वाहनाने नांदेड विमानतळाकडे प्रयाण करतील.
पालकमंत्र्यांच्या या दोन दिवसीय दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून संबंधित कार्यक्रमांची तयारी करण्यात येत आहे. स्वातंत्र्य दिनाच्या मुख्य शासकीय कार्यक्रमासह विविध विकासात्मक, आरोग्यविषयक आणि कृषी क्षेत्राशी संबंधित उपक्रमांना पालकमंत्र्यांची उपस्थिती राहणार असल्याने या दौऱ्यास विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
إرسال تعليق