दीड लाख भाविकांनी घेतले नागनाथाचे दर्शन
रविवारी सायंकाळपासून भाविकांचा ओघ वाढला; महाराष्ट्रासह परराज्यांतील भाविकांची मांदियाळी
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
18मंगळवार 2026
औंढा नागनाथ : नागपंचमी आणि पहिल्या श्रावणी सोमवारचा दुग्धशर्करा योग जुळून आल्याने बारा ज्योतिर्लिंगांपैकी आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ येथील श्री नागनाथ मंदिरात सोमवारी भक्तिसागर लोटला. महाराष्ट्रासह दिल्ली, मध्य प्रदेश, गुजरात, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू आदी राज्यांतून आलेल्या दीड लाखांहून अधिक भाविकांनी श्री नागनाथांचे दर्शन घेतले. रविवारी सायंकाळपासूनच भाविकांचा ओघ वाढला होता. रात्रीपासून दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
सुमारे २५ वर्षांनंतर श्रावणी सोमवार आणि नागपंचमीचा योग एकाच दिवशी आल्याने या पवित्र पर्वावर नागनाथाचे दर्शन घेण्यासाठी भाविक रविवारी सायंकाळपासूनच औंढा नागनाथ येथे दाखल होत होते. मध्यरात्री १२ वाजता श्री नागनाथांचा अभिषेक व महापूजा करण्यात आली. त्यानंतर पहाटे दोनच्या सुमारास भाविकांसाठी मंदिर खुले करण्यात आले. मंदिर खुले होण्यापूर्वीच दर्शनासाठी भाविकांची मोठी रांग लागली होती.
हर हर महादेव’, ‘बम बम भोले’च्या जयघोषाने संपूर्ण नागनाथ नगरी भक्तिमय झाली होती. अनेक शिवभक्त अनवाणी चालत मंदिरात दाखल झाले, तर अनेक भाविक दिंड्या आणि कावड घेऊन नागनाथाच्या दर्शनासाठी आले होते. सोमवारी पहाटेपासून भाविकांचे जथ्ये मंदिर परिसरात दाखल होत असल्याने परिसरात मोठी गर्दी झाली होती.
शिवमूठ अर्पण करून केली प्रार्थना
भूगर्भातील ज्योतिर्लिंग म्हणून श्री नागनाथ क्षेत्राला विशेष धार्मिक महत्त्व आहे. भाविकांनी तांदळाची शिवमूठ वाहून सुख, समाधान, शांती, समृद्धी आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी प्रार्थना केली. शिवमुठीसोबत विविध पत्रीही अर्पण करण्यात आली. औंढा नागनाथ हे शिव-विष्णू यांच्या एकात्म रूपाचे क्षेत्र मानले जात असल्याने या क्षेत्राला धार्मिकदृष्ट्या विशेष महत्त्व आहे.
नागपंचमीनिमित्त महिलांकडून वारुळ पूजन
नागपंचमीनिमित्त महिलांनी मंदिर परिसरासह विविध ठिकाणी वारुळाची पूजा केली. नागदेवतेला नैवेद्य अर्पण करून कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना करण्यात आली. सकाळपासूनच वारुळ पूजनासाठी महिलांची गर्दी दिसून आली.
भाविकांच्या सोयीसाठी संस्थानकडून नियोजन
भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन नागनाथ संस्थानच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दर्शन सुलभ व्हावे आणि गर्दीचे नियोजन करता यावे, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्याचे संस्थानच्या वतीने सांगण्यात आले. दिवसभरात जवळपास दीड लाखांहून अधिक भाविकांनी दर्शन घेतल्याची माहिती संस्थानच्या वतीने देण्यात आली.
बीडीडीएस पथकाकडून कसून तपासणी
भाविकांच्या प्रचंड गर्दीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीने बॉम्ब शोधक व नाशक पथकाकडून (बीडीडीएस) मंदिर परिसर, दर्शनाच्या रांगा आणि प्रमुख ठिकाणांची कसून तपासणी करण्यात आली. संशयास्पद वस्तू किंवा हालचाली आढळू नयेत, यासाठी विशेष खबरदारी घेण्यात आली.
मंदिर परिसर दिवसभर भाविकांच्या गर्दीने फुलून गेला होता. सुरक्षेसाठी संस्थानचे पदसिद्ध अध्यक्ष तथा तहसीलदार हरिश गाडे, वैजनाथ पवार, व्यवस्थापक सुरेंद्र डफळ, गार्डप्रमुख बबन सोनुने, जिल्हा पोलिस उपअधीक्षक सतीश वाघ, पोलिस निरीक्षक श्यामकुमार डोंगरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक आयुब शेख, पोलिस उपनिरीक्षक श्रीधर वाघमारे, अमोल इंगोले, श्रीदेवी वग्गे आदींसह सुरक्षा दल सहभागी झाले होते.
पाणी, निवासाच्या सुविधांचा अभाव; भाविकांची गैरसोय
एकीकडे लाखो भाविकांनी नागनाथाचे दर्शन घेतले असताना दुसरीकडे पिण्याचे पाणी आणि निवासाच्या सुविधांअभावी भाविकांची मोठी गैरसोय झाली. पिण्याच्या पाण्यासाठी भाविकांना धावपळ करावी लागली. प्रशासनाकडून पुरेशी पाणी व्यवस्था उपलब्ध करण्यात आली नसल्याची तक्रार भाविकांनी केली. तसेच निवासाची पुरेशी व्यवस्था नसल्याने अनेक भाविकांना मंदिर परिसरातच उघड्यावर रात्र काढावी लागली.
‘नागनाथा’च्या दारातच भाविकांची लूट?
श्रावण महिन्यात देशभरातून भाविक औंढा नागनाथ येथे दर्शनासाठी येत असताना मोबाइल, बॅग आणि चप्पल ठेवण्याच्या नावाखाली मनमानी पद्धतीने पैसे आकारले जात असल्याचा आरोप भाविकांकडून करण्यात आला आहे. यासंदर्भात अनिल अशोक भांडे यांनी नागनाथ संस्थानचे पदसिद्ध अध्यक्ष तथा तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे तक्रार केली आहे.
पश्चिम प्रवेशद्वार परिसरात नवीन मोबाइल लॉकर, लॉज रूम आणि चप्पल स्टँडची दुकाने सुरू करण्यास परवानगी देऊ नये, अशी मागणी त्यांनी केली आहे. परवानगी नसतानाही काही ठिकाणी दुकाने सुरू करून भाविकांकडून मनमानी पद्धतीने पैसे घेतले जात असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
दोन रुपयांच्या सुविधेसाठी दहा रुपयांची वसुली?
मोबाइल आणि बॅग ठेवण्यासाठी काही ठिकाणी १० रुपये आकारले जात असल्याचे अर्जदाराने निवेदनात नमूद केले आहे. दुसरीकडे, त्यांच्या दुकानात मोबाइलसाठी २ रुपये, चप्पलसाठी २ रुपये आणि बॅगसाठी ५ रुपये असे दर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांकडे मोबाइल, बॅग आणि चप्पल असणे स्वाभाविक आहे. त्यामुळे या वस्तू सुरक्षित ठेवण्यासाठी उपलब्ध सुविधांचे दर स्पष्ट, अधिकृत आणि पारदर्शक असावेत, अशी मागणी भाविकांकडून होत आहे. या आरोपांबाबत संस्थान आणि प्रशासनाची भूमिका स्पष्ट होणे अपेक्षित आहे.
नागपंचमी आणि श्रावणी सोमवारच्या निमित्ताने औंढा नागनाथ येथे भाविकांचा अभूतपूर्व जनसागर पाहायला मिळाला. मात्र, लाखो भाविकांची गर्दी लक्षात घेता पाणी, निवास, पार्किंग तसेच वस्तू सुरक्षित ठेवण्याच्या सुविधांमध्ये अधिक नियोजन करण्याची गरज अधोरेखित झाली आहे.
إرسال تعليق