योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवा
-खासदार नागेश पाटील आष्टीकर
विविध विकास कामांचा 'दिशा समिती'कडून सर्वंकष आढावा
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
हिंगोली, दि. २७ ऑगस्ट 2026 जिल्ह्यातील सामान्य नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सर्व विभागांनी परस्पर समन्वयाने प्रभावीपणे काम करावे. सर्व योजनांचा लाभ शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवावा, असे निर्देश दिशा समितीचे अध्यक्ष तथा खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी दिले. जिल्ह्यातील विविध विकास योजना व कामांचा जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीच्या (दिशा) बैठकीत सर्वंकष आढावा घेण्यात आला.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी समितीचे सहअध्यक्ष खासदार रामराव वडकुते, आमदार राजू नवघरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, दिशा समितीचे सदस्य संदीप ससे, दयानंद पतंगे, श्रीमती शारदा पोपळघाट, श्रीमती शशिकला भवर, भास्कर घोडके, श्रीमती अश्विनी इंगोले पाटील आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत मागील बैठकीतील निर्णयांवर झालेल्या कार्यवाहीचा तसेच प्रलंबित विषयांचा आढावा घेण्यात आला. विविध विकास योजनांची सद्यस्थिती, उद्दिष्टपूर्ती, पूर्ण व अपूर्ण कामे आणि प्रलंबित कामांची कारणे याबाबत विभागनिहाय माहिती घेण्यात आली.
महावितरण, कृषी, आरोग्य, सार्वजनिक बांधकाम, राष्ट्रीय महामार्ग आणि जलजीवन मिशनसह विविध विभागांच्या कामांचा आढावा घेण्यात आला. राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रम, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम, प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना, जलजीवन मिशन, भारतनेट, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, स्वच्छ भारत मिशन, समाजकल्याण, महिला व बालविकास, पशुसंवर्धन, आरोग्य आणि शिक्षण विभागातील योजनांचाही बैठकीत आढावा घेण्यात आला.
विविध योजनांबाबत बैठकीसाठी परिपूर्ण आणि अचूक माहिती सादर करावी. योजनांच्या अंमलबजावणीत पारदर्शकतेला प्राधान्य द्यावे. अपूर्ण माहिती सादर झाल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा खासदार नागेश पाटील आष्टीकर आणि खासदार रामराव वडकुते यांनी दिला.
*मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे*
समग्र शिक्षा अभियानांतर्गत शाळांमध्ये मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहांची उपलब्धता सुनिश्चित करावी. तसेच शाळांमध्ये सौर पॅनल उभारणीसाठी आवश्यक कार्यवाही करावी, अशा सूचना खासदार आष्टीकर यांनी शिक्षण विभागाला दिल्या.
*आयुष्मान भारत कार्ड वाटपाला गती*
आयुष्मान भारत कार्ड पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे. सामान्य नागरिकांना शासनाच्या आरोग्यविषयक योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळवून देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी, असे खासदार आष्टीकर यांनी सांगितले. जिल्ह्यातील विकास योजनांची उद्दिष्टपूर्ती, प्रलंबित कामांना गती आणि शासनाच्या योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी सर्व विभागांनी नियोजनबद्ध आणि समन्वयाने काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.
******
إرسال تعليق