प्रलंबित प्रकरणांसह विकासकामे व विविध कल्याणकारी योजनांचा मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्याकडून आढावा‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियान प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश

प्रलंबित प्रकरणांसह विकासकामे व विविध कल्याणकारी योजनांचा मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्याकडून आढावा
‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियान प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
हिंगोली, दि. १९ : जिल्ह्यातील विविध विकासकामांना गती देण्यासोबतच प्रलंबित प्रकरणांचा तातडीने निपटारा करावा, तसेच शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ पात्र नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवावा, अशा सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
हिंगोली जिल्हा परिषदेच्या सभागृहात जिल्हा समन्वय समितीची बैठक मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत जिल्ह्यातील विविध विभागांच्या प्रलंबित प्रकरणांसह विकासकामे, ‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियान तसेच विविध कल्याणकारी योजनांच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
विकासकामांना गती देण्याचे निर्देश
विविध योजनांतर्गत सुरू असलेल्या बांधकामांचा आढावा घेताना कामांमध्ये सुसूत्रता आणून निर्धारित वेळेत कामे पूर्ण करण्याच्या सूचना सीईओ गायकवाड यांनी दिल्या. नमो ग्रामसचिवालय इमारतींचे बांधकाम वेळेत पूर्ण करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले. तसेच मा. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री योजना आणि राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानांतर्गत ग्रामपंचायत इमारतींच्या बांधकामांचा आढावा घेण्यात आला.
ग्रामपंचायतींच्या दप्तर तपासणीचे कामकाज वाढविण्यासाठी विशेष कॅम्प आयोजित करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. ग्रामपंचायतींच्या घरपट्टी तसेच इतर कर वसुलीचा तालुकानिहाय आढावा घेऊन महसूलवाढीसाठी प्रभावी कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले.
घरकुल, जलसंधारण व गाळमुक्त शिवारावर भर
घरकुल योजनेच्या प्रगतीचा आढावा घेताना एमएचयूआयडीचे काम १०० टक्के पूर्ण करण्यासाठी गती वाढविण्याच्या सूचना देण्यात आल्या. नाला खोलीकरणाच्या कामांची तसेच गाळमुक्त धोरण आणि गाळमुक्त शिवार योजनेची प्रगतीही तपासण्यात आली.
‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियान प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश
‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियानाचा सविस्तर आढावा घेऊन हे अभियान गावपातळीवर प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी दिल्या. गावातील नागरिकांचे आरोग्य, स्वच्छता आणि प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा यांना प्राधान्य देऊन अभियानाची उद्दिष्टे पूर्ण करण्यावर भर देण्याचे त्यांनी सांगितले.
आयुष्मान भारत व वय वंदना कार्ड काढण्याला गती
आयुष्मान भारत कार्ड काढण्याच्या कामाला गती देण्यासाठी दैनिक आणि साप्ताहिक ‘ॲक्शन प्लॅन’ तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या. बाह्यरुग्ण विभागात तपासणीसाठी येणाऱ्या सर्व पात्र रुग्णांचे आयुष्मान भारत कार्ड काढून त्यांना योजनेचा लाभ मिळवून देण्याचे निर्देश देण्यात आले.
तसेच ७० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांचे ‘वय वंदना’ कार्ड काढून त्यांनाही संबंधित आरोग्य योजनांचा लाभ मिळवून देण्याच्या सूचना देण्यात आल्या.
पावसाळ्यातील आजारांबाबत आरोग्य विभागाला सतर्कतेच्या सूचना
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्याचे निर्देश आरोग्य विभागाला देण्यात आले. दूषित पाण्यामुळे साथीचे आजार पसरणार नाहीत, यासाठी ग्रामपंचायत स्तरावर आवश्यक खबरदारी घेण्यास सांगण्यात आले.
प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये पुरेशा प्रमाणात टीसीएल पावडर उपलब्ध ठेवावी तसेच पाण्याचे नमुने नियमितपणे तपासण्यात यावेत, अशा सूचना देण्यात आल्या.
अंगणवाडी बांधकामे व पोषण ट्रॅकरचा आढावा
अंगणवाडी केंद्रांच्या नवीन बांधकामांचा आढावा घेताना बांधकाम पूर्ण झालेली तसेच अद्याप सुरू न झालेली कामे तपासण्यात आली. प्रलंबित बांधकामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या. अंगणवाडी केंद्रांमधील पोषण ट्रॅकरच्या कामकाजाचाही आढावा घेण्यात आला.
समाज कल्याण विभागांतर्गत पाच टक्के दिव्यांग कल्याण निधीचा योग्य विनियोग करून पात्र लाभार्थ्यांना त्याचा लाभ मिळवून देण्याच्या सूचना देण्यात आल्या.
विविध कल्याणकारी योजनांचा सविस्तर आढावा
बैठकीत वार्षिक योजना, बांधकाम, देखभाल-दुरुस्ती, विकसित भारत अभियान, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा), जलतारा, वृक्षलागवड आणि शाळा दुरुस्ती यांसह विविध कामांचा आढावा घेण्यात आला.
विद्यार्थ्यांचे अपार आयडी (APAAR ID) तयार करण्याच्या कामाची तसेच बायोमेट्रिक प्रणालीच्या अंमलबजावणीचीही माहिती घेण्यात आली. वित्त विभागातील स्थानिक निधी, पीआरसी, महालेखाकार तसेच विभागाकडे प्रलंबित असलेल्या अग्रिम रकमेचा आढावाही घेण्यात आला.
जल जीवन मिशनअंतर्गत ‘हर घर जल’ नळ जोडणी योजना आणि पशुवैद्यकीय सेवांशी संबंधित योजनांच्या प्रगतीचाही बैठकीत आढावा घेण्यात आला.
न्यायालयीन प्रकरणे व विभागीय चौकशीला गती
विभागीय चौकशीचे प्रस्ताव तातडीने निकाली काढण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच सर्वोच्च न्यायालय आणि इतर न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा आढावा घेऊन त्यामध्ये आवश्यक ती कार्यवाही करून गती देण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
कृषी योजनांचा विशेष आढावा
कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना आणि बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना यांचा विशेष आढावा घेण्यात आला.
या योजनेंतर्गत मंजूर झालेल्या विहिरींपैकी किती विहिरींचे काम सुरू आहे, किती विहिरींचे काम अद्याप सुरू झालेले नाही आणि किती विहिरींचे बांधकाम पूर्ण झाले आहे, याची तालुकानिहाय माहिती घेण्यात आली. प्रलंबित कामांना गती देऊन पात्र लाभार्थ्यांना योजनांचा वेळेत लाभ मिळवून देण्याच्या सूचना देण्यात आल्या.
अधिकारी उपस्थित
बैठकीस अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.) समृद्धी दिवाने, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) केशव गडापोड, मुख्य लेखा व वित्त अधिकारी दिगंबर माडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण) विजय बोराटे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र पुरी, कृषी अधिकारी अतुल वायसे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) अशावरी काळे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) विपुन भागवत, कार्यकारी अभियंता राजू नरवाडे यांच्यासह सर्व तालुक्यांचे गट विकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, गट शिक्षणाधिकारी आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत घेतलेल्या निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी करून प्रलंबित कामे आणि प्रकरणे वेळेत पूर्ण करण्यावर विशेष भर देण्यात आला.

Post a Comment

أحدث أقدم