पाण्याचा प्रत्येक थेंब जपून वापरण्याची गरज : जिल्हाधिकारी राहुल गुप्ताहिंगोलीत ‘महा-वॉकेथॉन वॉक फॉर वॉटर’चा उत्साहात शुभारंभ; नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

पाण्याचा प्रत्येक थेंब जपून वापरण्याची गरज : जिल्हाधिकारी राहुल गुप्ता
हिंगोलीत ‘महा-वॉकेथॉन वॉक फॉर वॉटर’चा उत्साहात शुभारंभ; नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

हिंगोली, दि. 22 ऑगस्ट 2026  मृद व जलसंधारण, जलस्रोतांचे संरक्षण आणि पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने हिंगोली शहरात मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने ‘महा-वॉकेथॉन वॉक फॉर वॉटर’चे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला हिंगोलीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत जलसंधारणाचा संदेश जनमानसापर्यंत पोहोचविला.
महा-वॉकेथॉनच्या माध्यमातून ‘मृद व जलसंधारण करा, पाणी वाचवा, जलस्रोतांचे संरक्षण करा आणि पर्यावरणाचे संवर्धन करा’ हा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आला. मृद व जलसंधारण ही शाश्वत विकासाची अत्यंत महत्त्वाची बाब असून, भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी नागरिकांनी पाण्याचा प्रत्येक थेंब जपून आणि काटकसरीने वापरण्याची गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले.
 जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड आणि जिल्हा जलसंधारण अधिकारी विनोद निर्वळ यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद प्रशाला मैदान येथून हिरवी झेंडी दाखवून महा-वॉकेथॉनला सुरुवात करण्यात आली.
यावेळी आमदार संतोष बांगर यांनी ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ तसेच ‘झाडे लावा, झाडे जगवा’ असा संदेश देत जलसंधारण आणि पर्यावरण संवर्धनासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याचे आवाहन केले.
शासकीय इमारतींवर रेन वॉटर हार्वेस्टिंगचे आवाहन
जलसंधारण अभियानांतर्गत प्रत्येक विभागप्रमुखाने १५ ऑगस्ट २०२६ ते २६ जानेवारी २०२७ या कालावधीत आपल्या शासकीय इमारतीवर रेन वॉटर हार्वेस्टिंगची व्यवस्था करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सर्व अधिकाऱ्यांना केले. पावसाच्या पाण्याचे संधारण करून त्याचा योग्य वापर करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जलसंधारणाची शपथ
मृदसंधारण, जलसंधारण, पाण्याचा काटकसरीने वापर, जलस्रोतांचे संरक्षण आणि पर्यावरण संवर्धनासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. उपस्थित अधिकारी, कर्मचारी तसेच सहभागी नागरिकांना मृद व जलसंधारणाची शपथ देण्यात आली.
महा-वॉकेथॉनचा मार्ग जिल्हा परिषद प्रशाला मैदान, नवीन न्यायालय इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालय, नांदेड नाका, इंदिरा गांधी चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, निर्मल कॅफे, पाण्याची टाकी असा होता. या मार्गाने मार्गक्रमण केल्यानंतर पुन्हा जिल्हा परिषद प्रशाला मैदान येथे महा-वॉकेथॉनचा समारोप करण्यात आला.
जलजागृतीपर घोषणांनी शहर दुमदुमले
महा-वॉकेथॉनमध्ये अधिकारी, कर्मचारी, तरुणाई आणि नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. जलसंधारणाचे महत्त्व, पाण्याचे संवर्धन, मृदक्षय रोखणे, पावसाच्या पाण्याचे संधारण आणि पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती करण्यात आली. यावेळी नागरिक व तरुणांनी जलजागृतीपर घोषणा देत पाणी बचतीचा संदेश दिला.
पहिल्या दहा विजेत्यांचा गौरव
महा-वॉकेथॉनमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पहिल्या दहा विजेत्यांना सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमास जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागाचे जिल्हा जलसंधारण अधिकारी बी. एम. शिंदे, सहायक जिल्हा जलसंधारण अधिकारी विशाल चव्हाण, वसमतचे उपविभागीय जलसंधारण अधिकारी विकास याचावाड, जलसंधारण अधिकारी अनंत घोलकर, विठ्ठल काळबांडे, उमेश अनमुलवाड, पंकज बारहाते, चैताली मेंते, श्रद्धा डाकोरे, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक पवन माने यांच्यासह मृद व जलसंधारण विभागातील अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या महा-वॉकेथॉनच्या माध्यमातून ‘पाणी वाचवा, पाणी जिरवा, जलस्रोत जपा आणि पर्यावरण वाचवा’ हा संदेश हिंगोलीकरांनी एकजुटीने दिला.

Post a Comment

أحدث أقدم