खरडणी अनुदान घोटाळ्यात ‘सीएससी’ चालक संतोष रिंगे सहआरोपी
६ लाख १५ हजार ७०० रुपयांच्या अपहारप्रकरणी आरोपींची संख्या दोन; कलमवाढीने तपासाला वेग
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
03 सप्टेंबर 2026
आखाडा बाळापूर : कळमनुरी तालुक्यातील कयाधू नदीकाठच्या गावांमध्ये २०२४-२५ या वर्षात पूरामुळे झालेल्या पीक खरडणीच्या नुकसानीसाठी वितरित करण्यात आलेल्या अनुदानातील कथित गैरव्यवहारप्रकरणी आणखी एका आरोपीची भर पडली आहे. या प्रकरणात सहाय्यक कृषी अधिकारी यांच्यानंतर आता पिंपरी येथील सीएससी केंद्र चालक संतोष रामराव रिंगे याला पोलिसांनी सहआरोपी केले आहे. त्यामुळे या गुन्ह्यातील आरोपींची संख्या दोन झाली असून, तपासादरम्यान गुन्ह्यातील कलमांमध्येही वाढ करण्यात आली आहे.
कळमनुरी तालुक्यातील कयाधू नदीकाठच्या येगाव, पिंपरी, कृष्णापूर यासह परिसरातील गावांना २०२४-२५ मध्ये नदीला आलेल्या पुराचा मोठा फटका बसला होता. पुराच्या पाण्यामुळे नदीकाठची शेती आणि पिकांचे नुकसान झाले होते. या नुकसानीचे पंचनामे करून पात्र शेतकऱ्यांना शासनाकडून पीक खरडणी अनुदान देण्यात आले. मात्र, नुकसानीचे पंचनामे करताना काही ठिकाणी प्रत्यक्ष नुकसानीपेक्षा क्षेत्रफळ वाढवून दाखविण्यात आल्याचा तसेच काही व्यक्तींच्या नावे शेतजमीन नसतानाही त्यांना अनुदान वितरित केल्याचा प्रकार समोर आला.
या प्रकरणात मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचा संशय निर्माण झाल्यानंतर प्रशासनाने चौकशी सुरू केली. चौकशीअंती ६ लाख १५ हजार ७०० रुपयांच्या शासकीय निधीचा अपहार झाल्याचे निष्पन्न झाल्याने तहसीलदार जीवककुमार कांबळे यांच्या फिर्यादीवरून दोषी आढळलेले सहाय्यक कृषी अधिकारी एस. एस. संगमवार यांच्याविरुद्ध ८ जुलै २०२६ रोजी आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांच्या संथ तपासावर शेतकऱ्यांचा आक्षेप
गुन्हा दाखल झाल्यानंतर तपासाची गती अत्यंत संथ असल्याचा आरोप करीत येगाव, पिंपरी आणि कृष्णापूर परिसरातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. या प्रकरणात केवळ एका अधिकाऱ्यावर कारवाई न करता अनुदान वितरण प्रक्रियेत सहभागी असलेल्या इतर व्यक्तींचीही चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली होती.
शेतकऱ्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर प्रशासनाच्या निर्देशानुसार प्रकरणाचा पुन्हा तपास करण्यात आला. या तपासात पिंपरी येथील सीएससी केंद्र चालक संतोष रामराव रिंगे याची भूमिकाही संशयास्पद असल्याचे निदर्शनास आले.
वैयक्तिक खात्यावर अनुदानाची रक्कम जमा
तपासात सीएससी केंद्र चालक संतोष रिंगे याने खरडणी अनुदानाशी संबंधित रक्कम आपल्या वैयक्तिक बँक खात्यावरून जमा केल्याचे समोर आल्याची माहिती पोलिसांनी दिली. या आर्थिक व्यवहाराच्या आधारे रिंगे याला सदर गुन्ह्यात सहआरोपी करण्यात आले आहे.
तपास अधिकारी तथा सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर बसवंते यांनी याबाबत माहिती देताना, तपासादरम्यान आणखी एक आरोपी निष्पन्न झाला असून सीएससी केंद्र चालकाला सहआरोपी करण्यात आल्याचे सांगितले. तसेच गुन्ह्यातील कलमांमध्ये वाढ करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
शासनाची रक्कम परत; मात्र प्रश्न कायम
या प्रकरणात अनुदानाचा लाभ घेतलेल्या काही शेतकऱ्यांनी तसेच संबंधित आरोपी अधिकाऱ्यांनी शासनाकडे रक्कम जमा केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मात्र, शासनाची रक्कम परत करण्यात आली असली तरी निधी वितरणाच्या प्रक्रियेत नेमका गैरव्यवहार कसा झाला, त्यात कोणकोणाचा सहभाग होता आणि चुकीच्या पद्धतीने अनुदान मंजूर व वितरित करण्यामागे कोणाची भूमिका होती, याबाबतचे प्रश्न अद्याप कायम आहेत.
‘तिसरा नंबर कोणाचा?’ चर्चेला उधाण
खरडणी अनुदान घोटाळ्यात सुरुवातीला केवळ सहाय्यक कृषी अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता सीएससी केंद्र चालकाला सहआरोपी केल्याने या प्रकरणातील आरोपींची संख्या दोन झाली आहे. शेतकऱ्यांच्या पाठपुराव्यामुळे गुन्हा दाखल झाल्यानंतर आता दुसऱ्या आरोपीची भर पडल्याने ‘तिसरा नंबर कोणाचा?’ याची चर्चा परिसरात रंगली आहे.
या प्रकरणात आणखी काही अधिकारी, कर्मचारी अथवा संबंधित व्यक्तींचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त करून त्यांचीही चौकशी करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली होती. त्यामुळे आगामी तपासात आणखी कोणाची नावे समोर येतात, याकडे आता शेतकऱ्यांसह संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
दीड ते दोन वर्षांनंतर उघडकीस आलेल्या या प्रकरणात आतापर्यंत दोन आरोपी निष्पन्न झाले असून, तपास जसजसा पुढे जाईल तसतसे खरडणी अनुदानाच्या वितरणातील गैरव्यवहाराचे आणखी धागेदोरे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
टिप्पणी पोस्ट करा