प्राचार्य प्रवेश जयराम खडसे ३५ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्तरेखाताई राष्ट्रीय विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात भावूक निरोप व सत्कार सोहळा

प्राचार्य प्रवेश जयराम खडसे ३५ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त
रेखाताई राष्ट्रीय विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात भावूक निरोप व सत्कार सोहळा

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
2 सप्टेंबर 2026 
वाशिम : पंचशील विद्यालंकार शिक्षण प्रसारक संस्थेच्या रेखाताई राष्ट्रीय विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, वाशिम येथील प्राचार्य प्रवेश जयराम खडसे हे ३१ ऑगस्ट २०२६ रोजी ३५ वर्षांच्या प्रदीर्घ व उल्लेखनीय सेवेनंतर वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. त्यांच्या प्रदीर्घ शैक्षणिक व प्रशासकीय सेवेला उजाळा देत महाविद्यालयाच्या वतीने भावूक वातावरणात सत्कार व निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले.
प्राचार्य खडसे यांनी आपल्या सेवाकाळात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच संस्थेच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. शिस्तप्रिय, कर्तव्यनिष्ठ आणि विद्यार्थीहिताला प्राधान्य देणारे प्राचार्य म्हणून त्यांनी आपल्या कार्यकाळात शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांशी आपुलकीचे संबंध निर्माण केले. त्यांच्या सेवानिवृत्तीमुळे महाविद्यालय परिवारात भावनिक वातावरण निर्माण झाले.
या प्रसंगी पंचशील विद्यालंकार शिक्षण प्रसारक संस्थेच्या वतीने प्राचार्य प्रवेश जयराम खडसे व त्यांच्या पत्नी चांगुनाबाई प्रवेश खडसे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांच्या कुटुंबीयांचाही उपस्थितीत गौरव करण्यात आला. मुलगा विश्वजीत प्रवेश खडसे, सुनबाई दिव्या प्रसेनजित खडसे यांच्यासह संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व महाविद्यालय परिवाराने खडसे दाम्पत्याला शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमास संस्थेच्या संचालिका अर्चनाताई कांबळे, सचिव लुंबिनी कांबळे तसेच वंदना वानखेडे मॅडम, पल्लवी मिलिंद कांबळे, मोरे मॅडम यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थित शिक्षक व कर्मचाऱ्यांनी प्राचार्य खडसे यांच्या ३५ वर्षांच्या सेवाकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करताना मिळालेल्या अनुभवांचा आणि त्यांच्या सहकार्याचा अनेकांनी भावनिक शब्दांत उल्लेख केला. विद्यार्थ्यांनीही आपल्या लाडक्या प्राचार्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करत त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
सत्काराला उत्तर देताना प्राचार्य प्रवेश जयराम खडसे भावूक झाले. आपल्या प्रदीर्घ सेवाकाळात सहकार्य करणाऱ्या संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक यांचे त्यांनी मनःपूर्वक आभार मानले. “३५ वर्षांच्या सेवाकाळात संस्थेने आणि सहकाऱ्यांनी दिलेले प्रेम, सहकार्य व विश्वास हीच माझ्यासाठी मोठी शिदोरी आहे,” अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. सेवानिवृत्ती हा सेवेतून विराम असला तरी महाविद्यालयाशी असलेले ऋणानुबंध कायम राहतील, असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमास गजानन लादे, सदानंद ताजने, गजानन इंगोले, कैलास कराळे, संतोष वाठ, गणेश बोरकर, अनिल पवार, सुरज भगत, देविदास जाधव, दिनकर जाधव यांच्यासह महाविद्यालयातील शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप भांदूर्गे यांनी केले, तर जी. सी. लादे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना फराळाचे वाटप करण्यात आले आणि भावनिक वातावरणात निरोप समारंभाची सांगता झाली.
३५ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त झालेल्या प्राचार्य प्रवेश जयराम खडसे यांना उपस्थित मान्यवर, शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी पुढील आयुष्यासाठी निरोगी, आनंदी व सुखी जीवनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने