माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसादआरोग्य केंद्र शेवाळा येथे विशेष आरोग्य शिबिर; २७६ नागरिकांची मोफत तपासणी

‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
आरोग्य केंद्र शेवाळा येथे विशेष आरोग्य  शिबिर; २७६ नागरिकांची मोफत तपासणी 

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
हिंगोली, दि. १ सप्टेंबर : ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या गावातच उत्तम व दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे, विविध आजारांचे वेळीच निदान करणे आणि गावे रोगमुक्त करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या ‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ या विशेष अभियानांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र आखाडा बाळापूर अंतर्गत आरोग्यवर्धिनी केंद्र शेवाळा येथे विशेष आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. देवेंद्र जायभाये आणि जिल्हा माता-बाल संगोपन अधिकारी डॉ. रवींद्र पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली हे विशेष अभियान राबविण्यात आले.
२७६ नागरिकांची मोफत एक्स-रे तपासणी
राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र आखाडा बाळापूर अंतर्गत येणाऱ्या साळवा, येहळेगाव तुकाराम, कसबे धावंडा, शेवाळा आणि कृष्णापूर या पाच उपकेंद्र क्षेत्रांमध्ये मागील दोन दिवसांपासून विशेष आरोग्य तपासणी मोहीम राबविण्यात आली.
या मोहिमेत क्षयरोगाचा धोका अधिक असलेल्या नागरिकांची विशेष तपासणी करण्यात आली. ६० वर्षांवरील नागरिक, मधुमेहग्रस्त रुग्ण, व्यसन करणारे नागरिक, टीबी रुग्णांच्या संपर्कातील व्यक्ती तसेच १८ पेक्षा कमी बीएमआय (BMI) असलेल्या नागरिकांचा यामध्ये समावेश करण्यात आला.
या जोखीमग्रस्त गटातील जवळपास २७६ नागरिकांची मोफत एक्स-रे तपासणी करण्यात आली. या तपासणीदरम्यान दोन संशयित टीबी रुग्ण आढळून आले आहेत. संबंधित रुग्णांचे पुढील आवश्यक निदान करण्यात येणार असून, त्यानंतर त्यांच्यावर तात्काळ मोफत उपचार सुरू करण्यात येणार आहेत.
इ.सी.जी.सह विविध आरोग्य तपासण्या
शेवाळा येथील आरोग्य तपासणी शिबिरात नागरिकांना विविध आरोग्य सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या. हृदयविकाराचा धोका ओळखण्यासाठी इ.सी.जी. तपासणी, तसेच उच्च रक्तदाब, मधुमेह आणि इतर असंसर्गजन्य आजारांसाठी एनसीडी स्क्रीनिंग करण्यात आले.
क्षयरोग संशयित रुग्णांसाठी मोफत एक्स-रे तपासणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना मोठ्या शहरात किंवा खासगी केंद्रात जाण्याची गरज न पडता गावातच प्राथमिक स्वरूपातील आवश्यक आरोग्य तपासण्या उपलब्ध झाल्या.
पात्र लाभार्थ्यांना आयुष्मान भारत कार्डचे वाटप
शिबिरादरम्यान पात्र लाभार्थ्यांना ‘आयुष्मान भारत’ कार्डचे वाटप करण्यात आले. या माध्यमातून पात्र नागरिकांना ५ लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांचे आरोग्य कवच मिळणार असल्याने नागरिकांना शासनाच्या आरोग्य योजनांचा लाभ घेण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले.
माता-बालक आरोग्य व लसीकरणावरही भर
शिबिरात माता व बालकांच्या आरोग्याची विशेष तपासणी व मार्गदर्शन करण्यात आले. बालकांचे नियमित लसीकरण, गर्भवती महिलांची आरोग्य तपासणी तसेच माता-बालकांच्या आरोग्याशी संबंधित आवश्यक बाबींचा आढावा घेण्यात आला. नागरिकांना नियमित आरोग्य तपासणीचे महत्त्वही समजावून सांगण्यात आले.
‘टीबी मुक्त गाव’साठी जनजागृती
आरोग्य तपासणीबरोबरच ‘टीबी मुक्त गाव’ या संकल्पनेला बळ देण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. क्षयरोगाची लक्षणे, प्रतिबंधात्मक उपाय, वेळेत तपासणी आणि उपचाराचे महत्त्व याबाबत आरोग्य कर्मचाऱ्यांनी नागरिकांना माहिती दिली.
यासोबतच घनकचरा व्यवस्थापन, परिसराची स्वच्छता, वैयक्तिक स्वच्छता आणि निरोगी जीवनशैली याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. गाव स्वच्छ व निरोगी ठेवण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.
आरोग्य विभागाच्या पथकाचे परिश्रम
या विशेष आरोग्य अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश्वर कत्रूवार, जिल्हा क्षयरोग अधिकारी कार्यालयाचे पथक, एक्स-रे टेक्निशियन, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, गटप्रवर्तक, आशा स्वयंसेविका तसेच आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
ग्रामीण भागातील नागरिकांना गावातच प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा, तपासणी, निदान व उपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हे शिबिर महत्त्वपूर्ण ठरले. विशेषतः क्षयरोगासारख्या गंभीर आजाराचे लवकर निदान करून उपचार सुरू करण्यास या मोहिमेमुळे मदत होणार आहे. त्यामुळे ‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियानातून गावोगावी आरोग्य जनजागृती आणि रोगनियंत्रणाला अधिक गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने