शेतातील ४५० फूट केबल चोरीचा छडा; २१ वर्षीय आरोपी पोलिसांच्या ताब्यात
हिंगोली ग्रामीण पोलिसांची कारवाई; केबल जाळून तयार केलेले अंदाजे १५ ते २० किलो तार जप्त
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
04 सप्टेंबर 2026
हिंगोली : शेतातील शेडसमोर ठेवलेली सुमारे ४५० फूट लांबीची केबल चोरीस गेल्याप्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान करून एका २१ वर्षीय संशयित आरोपीस ताब्यात घेतले. शेख मतीन शेख कदीर (वय २१, रा. लिंबाळा मक्ता, ता. जि. हिंगोली) असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान त्याने सदर गुन्ह्याची कबुली दिली असून, चोरी केलेली केबल जाळून त्यापासून तयार केलेले अंदाजे १५ ते २० किलो तार पोलिसांनी जप्त केले आहे.
फिर्यादी एकनाथ चिमनाजी माने (वय ४३, व्यवसाय शेती, रा. विद्याळा, ता. जि. हिंगोली) यांनी हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यांच्या फिर्यादीनुसार, दि. १३ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजेपासून ते दि. १४ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० वाजेपर्यंत वडद येथील पत्रकार निलावर यांच्या शेतामध्ये फिर्यादीने बटईने केलेल्या शेतातील शेडसमोर ठेवलेली फेनोलक्स कंपनीची अंदाजे ४५० फूट केबल, किंमत सुमारे २० हजार २५० रुपये, अज्ञात व्यक्तीने चोरून नेली होती.
या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून हिंगोली ग्रामीण पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं. ५४८/२०२६, कलम ३०३(२) भारतीय न्याय संहिता अन्वये दि. १९ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ८.२२ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिसांनी गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे शेख मतीन शेख कदीर यास ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता, त्याने सदर केबल चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. चोरी केलेली सुमारे ४५० फूट केबल जाळून त्यापासून तयार केलेले तार एका नायलॉनच्या थैलीमध्ये ठेवण्यात आले होते. पोलिसांनी ही सामग्री ताब्यात घेऊन अंदाजे १५ ते २० किलो तार जप्त केला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. श्रेणीक लोढा, अपर पोलीस अधीक्षक श्री. कमलेश मीना, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सतीश वाघ आणि पोलीस निरीक्षक श्री. विष्णुकांत गुट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
सदर गुन्ह्याचा तपास पोहेकॉ. चव्हाण, पोहेकॉ. असलम गारवे, पो. विष्णू चव्हाण, पो. शंकर इढोळे, पो
सलीम पठाण तसेच होमगार्ड विजय चव्हाण यांनी केला.
हिंगोली ग्रामीण पोलिसांच्या या कारवाईमुळे शेतातून चोरीस गेलेल्या केबल चोरीचा तपास पुढे आला असून, जप्त करण्यात आलेल्या ताराच्या आधारे पुढील तपास सुरू आहे.
टिप्पणी पोस्ट करा