वसमतमध्ये तरुणाचा दगड-विटांनी मारहाण करून खून; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल‘पोलीसांना टिप का देतोस?’ या कारणावरून मारहाण केल्याचा फिर्यादीचा आरोप; आरोपी अद्याप फरार, पोलिसांकडून तपास सुरू

वसमतमध्ये तरुणाचा दगड-विटांनी मारहाण करून खून; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
‘पोलीसांना टिप का देतोस?’ या कारणावरून मारहाण केल्याचा फिर्यादीचा आरोप; आरोपी अद्याप
 फरार, पोलिसांकडून तपास सुरू

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
१० सप्टेंबर 2026 
वसमत, दि. १० सप्टेंबर : वसमत शहरातील सोमवारपेठ परिसरात एका २२ वर्षीय तरुणाचा दगड व विटांनी गंभीर मारहाण करून खून केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (दि. १०) मध्यरात्री घडली. या प्रकरणी वसमत शहर पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश डिगांबर गुंडाळे (वय २२, रा. रुपला पांढरी, ता. पूर्णा, जि. परभणी, सध्या रा. पाटीलनगर, वसमत) असे मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी पवन माणिकराव डाखोरे (वय २७, रा. पळसगाव, ता. वसमत) यांनी तोंडी फिर्याद दिली आहे.
दि. १० सप्टेंबर रोजी रात्री सुमारे १२.१५ वाजण्याच्या सुमारास सोमवारपेठ, वसमत येथे ही घटना घडली. पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, आरोपींनी संगनमत करून ‘तू पोलिसांना टिप का देतोस?’ या कारणावरून गणेश गुंडाळे याच्यावर दगड व विटांनी गंभीर मारहाण केली. या मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी रुषीकेश कंठाळे, अर्जुन बोचकरी आणि अनिकेत देवकर (सर्व रा. वसमत) यांच्याविरुद्ध वसमत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ०५७५/२०२६, कलम १०३(१), ३(५) भारतीय न्याय संहिता (भा.न्या.सं.) २०२३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दि. १० सप्टेंबर रोजी सकाळी ७.४९ वाजता दाखल करण्यात आला. या प्रकरणातील आरोपींना अद्याप अटक झालेली नसून, पोलिसांकडून त्यांचा शोध घेण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक वाघ, सहाय्यक पोलीस निरीक्षक परगेवार आणि पोलीस उपनिरीक्षक बोंडले यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक परगेवार करीत आहेत.
दरम्यान, या खुनामागील नेमके कारण, आरोपींची भूमिका आणि घटनेशी संबंधित इतर बाबींचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. गुन्ह्याची स्थिती तपासाधीन असून आरोपींच्या अटकेनंतर घटनेमागील अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने