औंढा पोलीस स्टेशन हद्दीत १९१ परवानाधारक गणेश मंडळे; डीजेवर बंदीगणेश मंडळांना सीसीटीव्ही कॅमेरे अनिवार्य; जुगार आढळल्यास थेट कारवाई — पोलीस निरीक्षक शामकुमार डोंगरे

औंढा पोलीस स्टेशन हद्दीत १९१ परवानाधारक गणेश मंडळे; डीजेवर बंदी
गणेश मंडळांना सीसीटीव्ही कॅमेरे अनिवार्य; जुगार आढळल्यास थेट कारवाई — पोलीस निरीक्षक शामकुमार डोंगरे

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
15 सप्टेंबर 2026 
हिंगोली प्रतिनिधी | औंढा नागनाथ
औंढा पोलीस स्टेशन हद्दीतील शहर व तालुक्यात यंदा परवानगी घेतलेल्या तब्बल १९१ गणेश मंडळांकडून गणेशमूर्तीची विधिवत स्थापना करण्यात आली आहे. गणेशोत्सव शांततेत, शिस्तीत आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडावा, यासाठी औंढा पोलिसांकडून कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षक श्रनिक लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शामकुमार डोंगरे यांच्या आदेशाने औंढा शहर व तालुक्यातील सर्व गणेश मंडळांवर पोलिसांचे विशेष लक्ष असून, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांकडून सातत्याने गस्त व निगराणी ठेवण्यात येत आहे.
सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे अनिवार्य
गणेश मंडळांनी परिसरातील सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे अनिवार्य करण्यात आले आहे. मंडळाच्या परिसरात घडणाऱ्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी पोलिसांकडून सीसीटीव्ही व्यवस्थेची पाहणी केली जात आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात अनुचित प्रकार घडू नयेत, यासाठी मंडळांनी पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
डीजेवर बंदी; नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई
गणेशोत्सवात ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी डीजेवर बंदी घालण्यात आली आहे. मंडळांनी उत्सव साजरा करताना शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांकडून थेट कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
गणेश मंडळाजवळ जुगार आढळल्यास थेट कारवाई
गणेशोत्सवाच्या नावाखाली मंडळांच्या परिसरात जुगार अथवा अन्य गैरप्रकार सुरू असल्याचे आढळल्यास संबंधितांवर कोणतीही गय न करता थेट कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या परिसरात कोणत्याही प्रकारचे अवैध कृत्य होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
विसर्जनावेळी गुलालाऐवजी फुलांची उधळण
गणेश विसर्जनाच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर गुलालाची उधळण न करता त्याऐवजी फुलांचा वापर करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. विसर्जन मिरवणुकीदरम्यान वाहतूक, ध्वनिप्रदूषण तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी गणेश मंडळांनी पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
सर्व गणेश मंडळांवर पोलिसांची करडी नजर
औंढा शहरासह तालुक्यातील सर्व गणेश मंडळांच्या परिसरात तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. संवेदनशील ठिकाणी विशेष लक्ष केंद्रित करण्यात येत असून, पोलिसांकडून नियमित गस्त घालण्यात येत आहे. गणेशोत्सव काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिस प्रशासन सज्ज झाले आहे.
गणेशोत्सव हा शांतता, बंधुभाव आणि सामाजिक एकोपा वाढविणारा उत्सव म्हणून साजरा करावा. मंडळांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करून पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक शामकुमार डोंगरे यांनी केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने