लाच घेताना पोलीस नाईक रंगेहात; ४ हजारांची मागणी, तडजोडीनंतर ३ हजार रुपये स्वीकारले

लाच घेताना पोलीस नाईक रंगेहात; ४ हजारांची मागणी, तडजोडीनंतर ३ हजार रुपये स्वीकारले

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
११ सप्टेंबर 2026 
हिंगोली एसीबीची गोरेगाव येथे सापळा कारवाई; एनसी प्रकरणात जामीन मिळवून देण्यासह प्रतिबंधात्मक कारवाईच्या नावाखाली लाचेची मागणी
हिंगोली : एनसी गुन्ह्यातील चॅप्टर केसच्या वेळी जामीन मिळवून देण्यासह पुढील पार्टीवर कडक प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी ४ हजार रुपयांची लाच मागून तडजोडीनंतर ३ हजार रुपये स्वीकारणाऱ्या पोलीस नाईकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने रंगेहात ताब्यात घेतले. ही कारवाई शुक्रवार, ११ सप्टेंबर २०२६ रोजी गोरेगाव येथे करण्यात आली.
एसीबीकडून मिळालेल्या माहितीनुसार, ३८ वर्षीय पुरुष शेतकऱ्याने १० सप्टेंबर रोजी हिंगोली येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात तक्रार दाखल केली होती. तक्रारदाराविरुद्ध दाखल असलेल्या एनसी गुन्ह्यामध्ये चॅप्टर केसच्या वेळी जामीन मिळवून देण्यासाठी तसेच पुढील पार्टीवर कडक प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी गोरेगाव पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस नाईक राहुल वसंत मैंदकर (वय ३६, ब.नं. ६८) यांनी कथितरीत्या ४ हजार रुपयांची लाच मागितल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले होते.
तक्रारीची एसीबीच्या पथकाने ११ सप्टेंबर रोजी गोरेगाव येथे पंच साक्षीदारांच्या उपस्थितीत पडताळणी केली. यावेळी संबंधित कामाबाबत चर्चा करताना पोलीस नाईकाने, “याच कामासाठी यापूर्वी सांगितले ना,” असे म्हणत तक्रारदाराकडे ४ हजार रुपयांची मागणी केल्याचे एसीबीच्या पडताळणीमध्ये निष्पन्न झाले. तक्रारदाराने विनंती केल्यानंतर तडजोडीअंती ३ हजार रुपये लाच स्वीकारण्याचे ठरल्याचे एसीबीने सांगितले.
त्यानंतर एसीबीच्या पथकाने सापळा रचला. गोरेगाव ते हिंगोली जाणाऱ्या रस्त्यावर तक्रारदाराकडून मागणी केल्याप्रमाणे ३ हजार रुपयांची लाचेची रक्कम पोलीस नाईक राहुल वसंत मैंदकर यांनी पंच साक्षीदारांच्या समक्ष स्वीकारल्याचा आरोप आहे. त्यानंतर एसीबीच्या पथकाने त्यांना लाचेच्या रकमेसह रंगेहात ताब्यात घेतले.
या प्रकरणी पोलीस ठाणे गोरेगाव, जिल्हा हिंगोली येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ मधील कलम ७ अन्वये गुन्हा नोंदविण्यात येणार असल्याचे एसीबीने कळविले आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीला अटक करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.
या सापळा कारवाईचे नेतृत्व लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, हिंगोलीचे पोलीस निरीक्षक राजेश मलपिलु यांनी केले. कारवाईवर पोलीस उपअधीक्षक विकास घनवट यांनी पर्यवेक्षण केले.
सापळा पथकात विजय शुक्ला, राजाराम फुपाटे, गजानन पवार, पोलीस कॉन्स्टेबल विनोद पुंडगे, शिवाजी वाघ तसेच चालक पोलीस हेड कॉन्स्टेबल अकबर शेख यांचा समावेश होता. सर्वांची नेमणूक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, हिंगोली येथे आहे.
या कारवाईस लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेडचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे तसेच अपर पोलीस अधीक्षक डॉ. अश्विनी जगताप यांचे मार्गदर्शन लाभले.
भ्रष्टाचाराविरोधात तक्रार करण्याचे आवाहन
लाच मागणाऱ्या कोणत्याही लोकसेवकाविरुद्ध नागरिकांनी पुढे येऊन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करावी. भ्रष्टाचारासंबंधी माहिती किंवा लाचेची मागणी झाल्यास संबंधितांनी एसीबीशी संपर्क साधण्याचे आवाहन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने