कार लोन सेटलमेंटच्या बहाण्याने महिलेवर अत्याचाराचा आरोप; हिंगोलीतील ग्रामसेवकावर गुन्हा दाखल


कार लोन सेटलमेंटच्या बहाण्याने महिलेवर अत्याचाराचा आरोप; हिंगोलीतील ग्रामसेवकावर  गुन्हा दाखल

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
19 सप्टेंबर 2026 
हिंगोली/जालना : मृत पतीच्या कार लोनचे न्यायालयातून सेटलमेंट करून देऊन कार परत मिळवून देतो, असे सांगून एका ३८ वर्षीय महिलेला विश्वासात घेत तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी गणेश पंजाबराव माने (रा. हिंगोली, ता. जि. हिंगोली) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ६४(१) व ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अद्याप अटक झालेली नसून प्रकरणाचा तपास सुरू आहे.

पोलिस नोंदीनुसार, संबंधित महिला आपल्या मृत पतीच्या कार लोनच्या प्रश्नामुळे अडचणीत होती. आरोपी गणेश माने याने कार लोनचे कोर्टातून सेटलमेंट करून देतो आणि कार परत मिळवून देतो, असे सांगून फिर्यादीचा विश्वास संपादन केल्याचे तक्रारीत नमूद आहे.

दि. ६ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ८ वाजेपासून ते दि. १४ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास, आरोपीच्या अकोला बायपास, बळसोंड रोड, हिंगोली येथील राहत्या घरी ही घटना घडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

तक्रारीनुसार, आरोपीने महिलेला कशाचे तरी गुंगीचे औषध देऊन आपल्या घरी नेले आणि तिच्याशी बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले, असा आरोप आहे. तसेच, सदर घटना कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीने पोलिसांना सांगितल्याचे नोंदीत नमूद आहे.

या प्रकरणी दि. १९ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५.५१ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा क्रमांक ६०७/२०२६ असून स्टे.डा. क्र. ३१/२०२६ अशी नोंद आहे.

पोउपनि राहुल घुले यांनी गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही केली असून, या प्रकरणाचा तपास मपोउपनि श्रीदेवी वम्गे करीत आहेत. पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.



Post a Comment

थोडे नवीन जरा जुने