ब्रह्मपुरीला राज्यस्तरीय पुरस्कार मिळवून देण्यासाठी झोकून देऊन काम करा
– मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड
‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियानाचा आढावा; ग्रामस्थांचा प्लास्टिकमुक्त गावाचा निर्धार
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
27 सप्टेंबर 2026
हिंगोली, दि. २६ : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान आणि स्मार्ट ग्राम म्हणून लौकिक मिळवलेल्या ब्रह्मपुरी गावाने ‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियानातही उल्लेखनीय कामगिरी करावी. गावाच्या मूल्यांकनात कोणत्याही घटकाचा अर्धा गुणही कमी पडता कामा नये. राज्यस्तरीय पुरस्कार मिळविण्याचे उद्दिष्ट ठेवून आरोग्य विभाग आणि ग्रामपंचायत प्रशासनाने परस्पर समन्वयाने झोकून देऊन काम करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी केले.
स्वच्छ भारत मिशनअंतर्गत ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान तसेच विशेष प्लास्टिकमुक्त गाव मोहिमेच्या पार्श्वभूमीवर मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी हिंगोली तालुक्यातील ब्रह्मपुरी ग्रामपंचायतीला भेट देऊन विविध विकासकामे, आरोग्यविषयक उपक्रम आणि कल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीचा प्रत्यक्ष आढावा घेतला.
१७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या ‘सेवा संकल्प अभियाना’च्या माध्यमातून ग्रामस्थांना विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली. यावेळी ग्रामस्थांच्या सहभागातून प्लास्टिक कचरा संकलन मोहीमही राबविण्यात आली. गाव प्लास्टिकमुक्त करण्यासाठी ग्रामस्थांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त केला.
मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाभरात प्लास्टिकमुक्त गाव अभियान राबविण्यात येत आहे. ब्रह्मपुरी येथे भेटीदरम्यान त्यांनी ‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियान, आयुष्मान भारत कार्ड नोंदणी, प्लास्टिकमुक्त भारत अभियान तसेच ग्रामपंचायत स्तरावरील विविध विकास योजनांची माहिती घेतली.
अभियानातील विविध निकषांची पूर्तता, आरोग्यविषयक उपक्रमांची अंमलबजावणी, ग्रामस्थांचा सहभाग आणि शासकीय योजनांचा लाभ पात्र नागरिकांपर्यंत पोहोचविण्याबाबत त्यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांशी चर्चा केली. अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करून प्रत्येक घटकात उत्कृष्ट कामगिरी करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
सीईओंनी विद्यार्थ्यांना शिकविली इंग्रजी बाराखडी
ग्रामपंचायतीच्या आढाव्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी गायकवाड यांनी अंगणवाडीला भेट देऊन बालकांच्या शैक्षणिक गुणवत्तेची पाहणी केली. लहान वयातच मुलांना अक्षरांची प्राथमिक ओळख आणि शिक्षणाची गोडी निर्माण होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
यानंतर त्यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला भेट देऊन सुमारे एक तास विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिक्षकाची भूमिका घेत पहिलीच्या विद्यार्थ्यांना मराठी वर्णाक्षरांचे इंग्रजीतील रूपांतर करून इंग्रजी बाराखडी सोप्या आणि रंजक पद्धतीने शिकविली.
विद्यार्थ्यांचा शैक्षणिक पाया पहिल्या वर्गापासूनच मजबूत झाला, तर गावातील एकूण शैक्षणिक दर्जा उंचावण्यास मदत होईल, असे गायकवाड यांनी सांगितले. केंद्रातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना बाराखडी उत्तम प्रकारे अवगत व्हावी, यासाठी विशेष लक्ष देण्याच्या सूचना त्यांनी केंद्रप्रमुखांना दिल्या.
विद्यार्थ्यांसोबत गायले महाराष्ट्र गीत
शाळेतील संवादादरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना ‘महाराष्ट्र गीत येते का?’ अशी विचारणा केली. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत त्यांच्या समवेत खणखणीत आवाजात महाराष्ट्र गीत गायले.
विद्यार्थ्यांचा उत्साह, त्यांचा सहभाग आणि शाळेतील शैक्षणिक वातावरण पाहून गायकवाड यांनी शिक्षक, कर्मचारी आणि ग्रामस्थांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याबरोबरच शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले.
प्लास्टिकमुक्त गावासाठी ग्रामस्थांचा निर्धार
गावातील प्लास्टिक कचऱ्याचे संकलन, त्याची योग्य विल्हेवाट आणि प्लास्टिकचा वापर कमी करण्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेण्याचे आवाहन करण्यात आले. ग्रामस्थांच्या सहभागाशिवाय प्लास्टिकमुक्त गावाचे उद्दिष्ट साध्य होणार नसल्याने प्रत्येक कुटुंबाने या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले.
यावेळी सरपंच शीतल घनगाव, उपसरपंच शिवकन्या तावरे, विस्तार अधिकारी विष्णू भोंजे, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. पांडुरंग भुरके, ग्रामपंचायत अधिकारी गजानन राऊत, आरोग्य कर्मचारी विजय वाकडे, आरोग्य सेविका रीना ठाकूर, आशा स्वयंसेविका, ग्रामपंचायत कर्मचारी तसेच ग्रामस्थ व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ब्रह्मपुरीने यापूर्वी विविध अभियानांमध्ये केलेल्या उल्लेखनीय कामाच्या पार्श्वभूमीवर ‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियानातही राज्यस्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी प्रशासन आणि ग्रामस्थांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
टिप्पणी पोस्ट करा