औंढ्यात डीजेवर पोलिसांचा दणका; १० गणेश मंडळांवर गुन्हेपोलिसांच्या सूचना धुडकावून विसर्जन मिरवणुकीत डीजेचा वापर; पाच डीजेंसह वाहने जप्त

औंढ्यात डीजेवर पोलिसांचा दणका; १० गणेश मंडळांवर गुन्हे
पोलिसांच्या सूचना धुडकावून विसर्जन मिरवणुकीत डीजेचा वापर; पाच डीजेंसह वाहने जप्त

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
27 सप्टेंबर 2026 
औंढा नागनाथ : गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेचा वापर करू नये, याबाबत पोलिसांनी दिलेल्या तोंडी तसेच लेखी सूचनांकडे दुर्लक्ष करून डीजे वाजविणाऱ्या १० गणेश मंडळांच्या अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांसह संबंधित डीजे चालक-मालकांविरुद्ध औंढा नागनाथ पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. पोलिसांच्या या कारवाईमुळे गणेश मंडळांमध्ये खळबळ उडाली असून, कारवाईदरम्यान पाच डीजे संचांसह वाहने जप्त करण्यात आली आहेत.
गणेश विसर्जन मिरवणुका शांततेत आणि ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे पालन करून पार पडाव्यात, यासाठी औंढा नागनाथ पोलिसांनी मिरवणुकीपूर्वी गणेश मंडळांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सूचना दिल्या होत्या. डीजेचा वापर टाळण्याबाबत मंडळांना तोंडी तसेच लेखी स्वरूपात कळविण्यात आले होते. तसेच शांतता समितीच्या बैठकीतही ध्वनिप्रदूषणाबाबत आवश्यक सूचना देण्यात आल्या होत्या.
मात्र, पोलिसांच्या सूचनांनंतरही काही गणेश मंडळांनी बाहेरगावाहून डीजे मागवून विसर्जन मिरवणुकीत त्याचा वापर केला. काही ठिकाणी मोठ्या आवाजात डीजे वाजविण्यात आल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. यानंतर पोलिसांनी संबंधित मंडळांवर कारवाई करत अध्यक्ष, पदाधिकारी तसेच डीजे चालक-मालकांविरुद्ध गुन्हे नोंदविले.
या कारवाईत पुरुषोत्तम भीमराव घोडके, नितीन रमेश बिरकुले, अमोल सुभाष गुंगे, विश्वनाथ राजाराम पवार, गजानन रामभाऊ पोपळघाट, सोमनाथ सिताराम काळे, ज्ञानेश्वर रामचंद्र घोडके, तुकाराम मुंजाजी गोरे, अनिल मुंजाजी राऊत आणि दिनेश दिलीप शिंदे यांच्यासह संबंधित डीजे चालक-मालकांचा समावेश आहे.
पोलिसांनी कारवाईदरम्यान पाच डीजे संचांसह संबंधित वाहने जप्त केली. विसर्जन मिरवणुकीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच ध्वनिप्रदूषणाला आळा बसावा, यासाठी पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
पोलिसांच्या सूचनांचे उल्लंघन केल्यास कारवाई
गणेशोत्सवाच्या काळात शांतता व सुव्यवस्था राखण्याबरोबरच ध्वनिप्रदूषणासंदर्भातील नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले होते. मंडळांना पूर्वसूचना देऊनही नियमांचे उल्लंघन झाल्याने संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आले. यापुढेही नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.
पोलीस निरीक्षक शामकुमार डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने