सेवा संकल्प अभियानाला वसईत उत्स्फूर्त प्रतिसाद
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे यांची ग्रामपंचायतीला भेट; विविध उपक्रमांची पाहणी करून ग्रामस्थांना मार्गदर्शन
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
हिंगोली, दि. २६ सप्टेंबर : भारताचे सन्माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या संविधानिक पदावरील कारकीर्दीला २५ वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून संपूर्ण महाराष्ट्रात १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान’ तसेच विविध लोककल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यास गती देण्यात येत आहे.
शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात विविध लोकाभिमुख उपक्रम राबविण्यात येत असून, त्याच अनुषंगाने शनिवार, दि. २६ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजता जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सुधीर ठोंबरे यांनी औंढा नागनाथ तालुक्यातील ग्रामपंचायत मौजे वसई येथे प्रत्यक्ष भेट देऊन विविध उपक्रमांची पाहणी केली. यावेळी त्यांनी ग्रामस्थ, ग्रामपंचायत प्रशासन आणि संबंधित अधिकारी यांच्याशी संवाद साधत अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत मार्गदर्शन केले.
‘सेवा माझे योगदान’ मोहिमेत विविध उपक्रम
ग्रामपंचायत मौजे वसई येथे ‘सेवा संकल्प अभियाना’अंतर्गत ‘सेवा माझे योगदान’ या मोहिमेत विविध लोकाभिमुख उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांमध्ये ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला.
गाव परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. प्लास्टिकच्या वापरामुळे होणारे पर्यावरणीय दुष्परिणाम ग्रामस्थांना समजावून सांगत गाव प्लास्टिकमुक्त करण्यासाठी जनजागृती करण्यात आली. सार्वजनिक ठिकाणे, रस्ते व परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
वृक्षारोपणातून हरित गावाचा संकल्प :
पर्यावरणाचे संवर्धन आणि गावाचा परिसर अधिक हिरवागार करण्याच्या उद्देशाने विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. लावण्यात आलेल्या वृक्षांचे संगोपन व संवर्धन करण्याची जबाबदारी ग्रामस्थांनी स्वीकारावी, असे आवाहन करण्यात आले.
सेवा ज्योत यात्रेतून जनजागृती :
‘सेवा संकल्प अभियानाचा संदेश प्रत्येक घरापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने सेवा ज्योत यात्रेचे आयोजन करण्यात आले. शासनाच्या विविध योजना, नागरिकांसाठी उपलब्ध सुविधा आणि ग्रामपातळीवर राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आली.
आरोग्य तपासणी शिबिर :
ग्रामस्थांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी मोफत आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. यामध्ये नागरिकांची प्राथमिक आरोग्य तपासणी करून आवश्यक त्या आरोग्यविषयक सूचना व सल्ला देण्यात आला.
सेवा सेतू अभियानातून दाखले व प्रमाणपत्रांचे वाटप :
नागरिकांना शासकीय कार्यालयांच्या वारंवार फेऱ्या माराव्या लागू नयेत, यासाठी विविध आवश्यक शासकीय दाखले व प्रमाणपत्रांचे तात्काळ वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे नागरिकांना शासकीय सेवा त्यांच्या गावातच उपलब्ध होण्यास मदत झाली.
शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याचे आवाहन
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे यांनी अभियानांतर्गत राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची पाहणी करून समाधान व्यक्त केले. ग्रामपंचायतीने केवळ अभियानाच्या कालावधीतच नव्हे, तर नियमितपणे लोकाभिमुख उपक्रम राबवून नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे त्यांनी सांगितले.
शासनाच्या विविध कल्याणकारी योजना आणि सेवा समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणे आवश्यक असून, ग्रामपंचायत ही नागरिक आणि प्रशासन यांच्यातील महत्त्वाची कडी आहे. त्यामुळे नागरिकांना आवश्यक असलेल्या सेवा, दाखले, प्रमाणपत्रे तसेच विविध योजनांची माहिती प्रभावीपणे उपलब्ध करून देण्याचे आवाहन त्यांनी केले.
ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग
या उपक्रमांना ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद मिळाला. स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, आरोग्य, शासकीय सेवा आणि जनजागृती या विविध क्षेत्रांतील उपक्रमांमुळे ‘सेवा संकल्प अभियानाचा’ संदेश ग्रामपातळीवर प्रभावीपणे पोहोचत असल्याचे चित्र वसई येथे दिसून आले.
या प्रसंगी ग्रामपंचायत मौजे वसईचे प्रशासक, ग्रामपंचायत अधिकारी, पंचायत समिती औंढा नागनाथचे सहाय्यक गटविकास अधिकारी, संबंधित कर्मचारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांना सहकार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.
टिप्पणी पोस्ट करा