डीजेमुक्त वातावरणात हिंगोली ग्रामीण पोलिसांकडून गणरायाला भावपूर्ण निरोप
पारंपरिक वाद्यांच्या निनादात मिरवणूक; गुलालाऐवजी पुष्पवर्षाव, सामाजिक संदेश देत गणपती विसर्जन
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
24 सप्टेंबर 2026
हिंगोली : हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात गेल्या दोन वर्षांपासून गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. यंदाही दहा दिवसांच्या गणेशोत्सवादरम्यान विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उत्सवाची सांगता गुरुवारी गणरायाच्या भावपूर्ण विसर्जनाने करण्यात आली. यावेळी डीजेमुक्त मिरवणूक, पारंपरिक वाद्यांचा निनाद आणि गुलालाऐवजी पुष्पवर्षाव हे या विसर्जन मिरवणुकीचे विशेष आकर्षण ठरले.
पोलीस अधीक्षक श्रनिक लोढा यांच्या आदेशानुसार तसेच पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. दहा दिवसांच्या कालावधीत पोलीस ठाण्यात भक्तिमय व आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.
गणेशोत्सवानिमित्त रक्तदान शिबिर, सायबर कॅफेच्या माध्यमातून मार्गदर्शन, कायदेविषयक सल्ला, महिला सुरक्षा अभियान आणि अन्नदान अशा विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्यामुळे गणेशोत्सवाला सामाजिक बांधिलकीची जोड देण्यात आली.
गणरायाच्या विसर्जनासाठी काढण्यात आलेल्या मिरवणुकीत डीजेचा वापर टाळण्यात आला. पोलिसांनी स्वतः पारंपरिक बँड वाद्ये वाजवत गणपती बाप्पाला निरोप दिला. सामाजिक संदेश असलेले फलक मिरवणुकीत प्रदर्शित करण्यात आले. गुलालाची उधळण न करता फुलांची उधळण आणि पुष्पवर्षाव करत पर्यावरणपूरक व शिस्तबद्ध पद्धतीने विसर्जन करण्यात आले.
गणपती बाप्पाला निरोप देताना पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी तसेच होमगार्ड यांचा मोठा सहभाग होता. ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात आणि पारंपरिक वाद्यांच्या निनादात वातावरण भक्तिमय झाले होते.
पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सहभाग
या गणेश विसर्जन मिरवणुकीत पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे, पोलीस उपनिरीक्षक वग्गे मॅडम, पोलीस उपनिरीक्षक राहुल घुले, मेथेकर, सुब्रावाड, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जाधव, वाघमारे तसेच पोलीस हवालदार ढेंबरे, पंडितकर, खोडवे, जमदाडे, गायकवाड यांच्यासह हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यातील सर्व पोलीस अंमलदार आणि होमगार्ड सहभागी झाले होते.
दहा दिवस भक्तिमय वातावरणात गणेशोत्सव साजरा केल्यानंतर पारंपरिक पद्धतीने आणि सामाजिक संदेश देत गणरायाला निरोप देण्यात आल्याने या उपक्रमाचे नागरिकांकडून कौतुक करण्यात आले.
टिप्पणी पोस्ट करा