हिंगोलीत विनापरवाना फटाक्यांचा 86 लाखांचा साठा जप्त
गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात ज्वालाग्राही फटाक्यांचा साठा;
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
08 ऑक्टोंबर 2026
हिंगोली ग्रामीण पोलिसांची कारवाई
हिंगोली : नागरिकांच्या जीवितास व आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो, हे माहीत असतानाही विनापरवाना व बेकायदेशीररित्या मोठ्या प्रमाणात फटाक्यांचा साठा करून ठेवणाऱ्या व्यक्तीविरुद्ध हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल ८६ लाख ३ हजार ११० रुपयांचा ज्वालाग्राही फटाक्यांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय रामकृष्ण बासटवार, रा. मारवाडी गल्ली, हिंगोली याच्या मालकीच्या मौजे कारवाडी, सुराणानगर परिसरातील गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात फटाक्यांचा साठा करून ठेवण्यात आला होता. सदर साठ्यासाठी आवश्यक परवाना नसतानाही फटाक्यांचा साठा करण्यात आल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
या प्रकरणी श्रीदेवी दिलीपराव वग्गे यांनी दिलेल्या लेखी फिर्यादीवरून हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ६२४/२०२६ अन्वये कलम १२५, २२३, २८७, २८८ भारतीय न्याय संहिता तसेच कलम ९ (ब) स्फोटक पदार्थ अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
६ जुलै २०२६ रोजी रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास कारवाडी, सुराणानगर येथील संबंधित गोडाऊनमध्ये हा फटाक्यांचा साठा आढळून आल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ज्वालाग्राही फटाके ठेवण्यात आले होते. त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता.
दरम्यान, या प्रकरणी ८ ऑगस्ट २०२६ रोजी मध्यरात्री १२.५८ वाजता हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्ह्याचा तपास मपोउपनि वग्गे करीत आहेत. गुन्ह्याचा तपास सध्या सुरू असून, आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.
कारवाईदरम्यान पोलीस निरीक्षक गफार शेख, मपोउपनि वग्गे, पोउपनि घुले तसेच पोलीस हवालदार खोडवे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही पोहेकॉ. १३७ सोनपावले यांनी केली.
फटाक्यांचा मोठ्या प्रमाणातील विनापरवाना साठा आढळून आल्याने या प्रकरणाकडे पोलिसांनी गांभीर्याने पाहिले असून, पुढील तपासात या साठ्याबाबत आणखी काही बाबी समोर येतात का, याकडे लक्ष लागले आहे.
टिप्पणी पोस्ट करा