जिल्ह्यात ‘सेवा संकल्प अभियान’ आणि ‘स्वच्छ सेवा आकलन’ उपक्रमांचा धडाकाशासकीय योजनांचा लाभ तळागाळातील नागरिकांपर्यंत; स्वच्छता, आरोग्य, शिक्षण व जनजागृतीवर भर – मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड

जिल्ह्यात ‘सेवा संकल्प अभियान’ आणि ‘स्वच्छ सेवा आकलन’ उपक्रमांचा धडाका
शासकीय योजनांचा लाभ तळागाळातील नागरिकांपर्यंत; स्वच्छता, आरोग्य, शिक्षण व जनजागृतीवर भर – मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
01 ऑक्टोबर २०२६ 
हिंगोली, दि. १ ऑक्टोबर : जिल्ह्यात १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ‘सेवा संकल्प अभियान’ तसेच स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ‘स्वच्छ सेवा आकलन’ हे उपक्रम उत्साहात आणि प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. या अभियानाच्या माध्यमातून शासकीय योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासोबतच स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, महिला व बालकल्याण, वृक्षारोपण आणि जनजागृतीवर विशेष भर देण्यात येत असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी दिली.
आकाशवाणी परभणी केंद्रावरून आज सकाळी ७.४० वाजता प्रसारित झालेल्या कार्यक्रमात मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध उपक्रमांची सविस्तर माहिती दिली.
पालकमंत्र्यांच्या हस्ते अभियानाचा शुभारंभ
१७ सप्टेंबर रोजी राज्याचे अन्न व प्रशासन व विशेष सहाय मंत्री तथा हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते ‘सेवा संकल्प अभियानाचे’ उद्घाटन करण्यात आले. यावेळी जनजागृतीसाठी बाईक रॅलीचेही आयोजन करण्यात आले.
‘विकसित भारत संकल्प यात्रा’ आणि जनजागृती अभियानांतर्गत सेनगाव येथे पालकमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य मोटरसायकल रॅली काढण्यात आली. विकसित भारत २०४७ तसेच विविध शासकीय योजनांची माहिती गावागावांतील नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्ह्यात विविध ठिकाणी जनजागृतीपर उपक्रम आणि रॅलींचे आयोजन करण्यात आले.
‘सेवा सेतू’तून नागरिकांना विविध दाखल्यांचे वाटप
‘सेवा सेतू अभियाना’अंतर्गत कळमनुरी तालुक्यातील गुंडलवाडी येथे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते नागरिकांना विविध शासकीय दाखल्यांचे वाटप करण्यात आले. याच कार्यक्रमात १४ पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काच्या घरकुलांच्या किल्ल्या व घरांचा ताबा देण्यात आला.
या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांचा थेट लाभ मिळवून देण्यावर प्रशासनाने भर दिला आहे.
आरोग्य शिबिरांसह स्वच्छता मोहिमेला वेग
अभियानाच्या कालावधीत जिल्ह्यात पाच विविध आरोग्य शिबिरांचे यशस्वी आयोजन करण्यात आले. नागरिकांना आरोग्यविषयक सेवा आणि मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यासोबतच आरोग्यविषयक जनजागृती करण्यात आली.
‘सेवा माझे योगदान’ या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील सर्व पाच पंचायत समित्यांच्या परिसरात विशेष स्वच्छता अभियान राबविण्यात आले. याशिवाय तालुका आणि गावपातळीवर स्वच्छता मोहिमा राबवून मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात आले.
८७५ शाळांमध्ये चित्रकला व वक्तृत्व स्पर्धा
मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील शाळा आणि अंगणवाड्यांमध्ये विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.
जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या ८७५ प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये चित्रकला आणि वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात आले असून, विद्यार्थ्यांच्या रॅलींचेही आयोजन करण्यात आले.
५०२ अंगणवाड्यांमध्ये ‘अंगणवाडी उत्सव’
जिल्ह्यातील ५०२ अंगणवाड्यांमध्ये ‘अंगणवाडी उत्सव’ साजरा करण्यात आला. यावेळी स्तनदा माता तसेच लहान मुलांच्या मातांचा विशेष सत्कार करण्यात आला. महिला व बालकांच्या आरोग्य आणि पोषणाबाबत जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात आले.
‘सेवा ज्योत यात्रा’तून शासकीय योजनांचा जागर
पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते १५० नागरिकांच्या सहभागाने ‘सेवा ज्योत यात्रा’ काढण्यात आली. विविध शासकीय योजनांचा लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांच्या घरी ‘आशीर्वादाचा दिवा’ (पणती) लावून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
१७ सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील ८६४ लाभार्थ्यांच्या घरी विविध प्रकारच्या रांगोळ्या काढण्यात आल्या. यामध्ये मानवी रांगोळीच्या माध्यमातून भारताचा नकाशा साकारण्यात आला. या उपक्रमातून शासकीय योजनांचा लाभ मिळालेल्या कुटुंबांचा आनंद आणि योजनांविषयी जनजागृती अधोरेखित करण्यात आली.
सिंचन विहिरींमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ
डॉ. बाबासाहेब आंबेडकर योजना आणि बिरसा मुंडा क्रांती योजनेअंतर्गत मिळालेल्या सिंचन विहिरींचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ झाल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी सांगितले.
या योजनांचा लाभ घेतलेल्या काही शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्न ५० ते ६० हजार रुपयांवरून ८ ते ९ लाख रुपयांपर्यंत वाढल्याचे त्यांनी नमूद केले. अशा यशस्वी शेतकऱ्यांचा सत्कार करून त्यांच्या ‘सक्सेस स्टोरीज’ अर्थात यशोगाथा तयार करण्यात येत आहेत.
‘माझ्या बाळाची पोषण कहाणी’तून पोषणाचा संदेश
गावागावांत ‘माझ्या बाळाची पोषण कहाणी’ या विषयावर व्हिडिओ तयार करण्यात येत आहेत. या माध्यमातून बालकांचे पोषण, माता-बाल आरोग्य आणि शासनाच्या विविध योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जात आहे.
मुख्यमंत्री यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यात ‘सेवा संकल्प अभियान’ आणि ‘स्वच्छ सेवा आकलन’ हे उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत असून, नागरिकांचा सहभाग वाढवून शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासनाकडून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी दिली.

Post a Comment

أحدث أقدم