पत्रकार क्रिकेट संघाच्या अध्यक्षपदी विजय गुंडेकर
दसरा क्रिकेट सामन्यांच्या आयोजनाची तयारी; पत्रकारांच्या एकमताने निवड
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
02 ऑक्टोबर 2026
प्रतिनिधी : मागील तीन वर्षांपासून ऐतिहासिक दसरा उत्सवानिमित्त पत्रकार क्रिकेट संघाच्या वतीने क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात येत आहे. पत्रकारांमध्ये स्नेहभाव, संघभावना आणि खेळाडूवृत्ती वाढीस लागावी, या उद्देशाने सुरू असलेल्या या उपक्रमाला यंदाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळणार आहे.
यंदाच्या पत्रकार क्रिकेट संघाच्या अध्यक्षपदी ‘तरुण भारत’चे विजय गुंडेकर यांची पत्रकारांच्या सर्वानुमते निवड करण्यात आली. पत्रकारांच्या एकमताने झालेल्या या निवडीमुळे आगामी क्रिकेट सामन्यांच्या आयोजनाला अधिक गती मिळणार आहे.
या निवडीप्रसंगी क्रिकेट संघाचे प्रसाद आर्वीकर, सुनील पाठक, सुधाकर वाढवे, शिवाजी मिटकरी, प्रकाश इंगोले, रमेश वाबळे, सुमित कानेड, दिलीप हाळदे, सचिन कावडे, गोपाल सरनाईक, हरपाल शेट्टी यांच्यासह संघाचे सर्व पदाधिकारी व पत्रकार उपस्थित होते.
दसरा हा सण उत्साहात साजरा केला जात असताना पत्रकार क्रिकेट सामन्यांच्या माध्यमातून पत्रकारांना एकत्र आणण्याचा हा उपक्रम गेल्या तीन वर्षांपासून राबविला जात आहे. वृत्तांकनाच्या धावपळीत व्यस्त असलेल्या पत्रकारांना मैदानी खेळाच्या माध्यमातून एकत्र येण्याची संधी या सामन्यांमुळे मिळते. त्यामुळे या उपक्रमाकडे पत्रकारांमध्येही उत्सुकतेने पाहिले जाते.
नवनिर्वाचित अध्यक्ष विजय गुंडेकर यांच्या नेतृत्वाखाली यंदाच्या क्रिकेट सामन्यांचे नियोजन करण्यात येणार असून, लवकरच सामन्यांचे वेळापत्रक, ठिकाण आणि सहभागी संघांची माहिती जाहीर करण्यात येणार आहे. दसरा उत्सवानिमित्त होणाऱ्या या क्रिकेट सामन्यांसाठी पत्रकारांमध्ये आतापासूनच उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पत्रकारिता आणि क्रीडा क्षेत्रातील स्नेहबंध अधिक दृढ करणाऱ्या या उपक्रमाची परंपरा यंदाही उत्साहात कायम राहणार आहे.
إرسال تعليق