दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ‘दांडिया मस्ती महोत्सव २०२६’ रद्दमहोत्सवासाठी होणारा संपूर्ण खर्च दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीत देण्याचा आयोजकांचा निर्णय

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ‘दांडिया मस्ती महोत्सव २०२६’ रद्द
महोत्सवासाठी होणारा संपूर्ण खर्च दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीत देण्याचा आयोजकांचा निर्णय

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
4 ऑक्टोबर 2026
हिंगोली : हिंगोली शहरातील नवा मोंढा परिसरात दरवर्षी उत्साहात आयोजित करण्यात येणारा ‘दांडिया मस्ती महोत्सव २०२६’ यंदा दुष्काळाच्या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्याचा निर्णय आयोजकांच्या वतीने जाहीर करण्यात आला आहे. उत्सवासाठी होणारा खर्च टाळून ती रक्कम दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करण्याचा सामाजिक निर्णय आयोजकांनी घेतला आहे.
नवरात्रोत्सवाच्या काळात हिंगोली शहरातील नागरिकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणाऱ्या दांडिया मस्ती महोत्सवात दरवर्षी मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होत असतात. मात्र, यंदा दुष्काळामुळे शेतकरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांसमोर निर्माण झालेल्या अडचणींचा विचार करून उत्सवावरील खर्चापेक्षा गरजू शेतकऱ्यांना मदत करणे अधिक महत्त्वाचे असल्याची भूमिका आयोजकांनी घेतली आहे.
महोत्सवाच्या आयोजनासाठी अपेक्षित असलेला खर्च यंदा पूर्णपणे मुख्यमंत्री सहायता निधीकडे वळविण्यात येणार असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे. या निर्णयातून सामाजिक बांधिलकी जपत दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबांना मदतीचा हात देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
या निर्णयाची माहिती अध्यक्ष केशव दुबे, सागर तापडिया, विशाल बडजाते, सुमित बडेरा, गोपाल बाहेती, डॉ. नितीन पुरोहित, अंकुश जायसवाल, शैलेश जायसवाल, संदीप गीते, विशाल सोनी, सावन तोषनीवाल यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांच्या वतीने देण्यात आली.
इतर मंडळांनीही पुढे येण्याचे आवाहन
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शहरातील इतर सेवाभावी संस्था, दुर्गादेवी मंडळे, सामाजिक संघटना तसेच विविध सार्वजनिक मंडळांनीही पुढाकार घ्यावा, असे आवाहन युवा फ्रेंड्स असोसिएशन व श्रीराम बाल गणेश मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
सण-उत्सवांच्या माध्यमातून होणारा अनावश्यक खर्च टाळून तो निधी गरजू आणि संकटग्रस्त नागरिकांसाठी वापरल्यास त्याचा मोठा सामाजिक फायदा होऊ शकतो. याच भावनेतून दांडिया मस्ती महोत्सव रद्द करून त्यावरील खर्च शेतकऱ्यांच्या मदतीसाठी देण्याचा निर्णय सामाजिक एकतेचा आणि संवेदनशीलतेचा संदेश देणारा असल्याचे आयोजकांनी म्हटले आहे.
‘उत्सवापेक्षा शेतकऱ्यांची मदत महत्त्वाची’
दुष्काळाच्या संकटात शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणे हीच खरी सामाजिक जबाबदारी आहे. त्यामुळे यंदा दांडिया महोत्सवाचा जल्लोष करण्याऐवजी त्यासाठी होणारा खर्च शेतकऱ्यांच्या मदतीसाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हिंगोलीतील इतर संस्था व मंडळांनीही अशाच प्रकारे सामाजिक बांधिलकी जपत मदतीसाठी पुढे यावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने