फटाक्यांमुळे हिंगोलीत दोन घरांना आग; नऊ जखमी

फटाक्यांमुळे हिंगोलीत दोन घरांना आग; नऊ जखमी

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
हिंगोली : शहरातील मारवाडी गल्ली  परिसरात सोमवारी (दि. ५) रात्री सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास फटाक्यांमुळे अचानक दोन घरांना आग लागल्याची घटना घडली. या आगीत नऊ नागरिक जखमी झाल्याची माहिती समोर आली असून, जखमींवर हिंगोली शहरातील लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मारवाडी चाळ परिसरातील बासटवार यांच्या घरात फटाक्यांमुळे अचानक आग लागली. काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केले आणि घराजवळ असलेल्या भरत पैलवान यांच्या घरालाही आगीने कवेत घेतले. अचानक लागलेल्या आगीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
आगीची तीव्रता वाढत असताना परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. आग विझविण्यासाठी अग्निशामक दलाचे जवान, पोलीस अधिकारी-कर्मचारी तसेच नागरिकांनी प्रयत्न केले. आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरले होते. अचानक घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांची मोठी धावपळ उडाली.
या दुर्घटनेत नऊ जण जखमी झाले असून, त्यांना तातडीने उपचारासाठी हिंगोली शहरातील लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. जखमींवर उपचार सुरू असल्याची माहिती डॉ. अखिल अग्रवाल यांनी दिली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस व अग्निशामक दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. दरम्यान, फटाक्यांमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती असून, घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.
सणासुदीच्या काळात फटाके फोडताना नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने