हिंगोलीतील फटाक्याच्या आगीत दोघांचा मृत्यू; मृतांची ओळख पटलीज खमींवर नांदेड, संभाजीनगर येथे उपचार; तीन घरांचे व तीन दुचाकींचे नुकसान

हिंगोलीतील फटाक्याच्या आगीत दोघांचा मृत्यू; मृतांची ओळख पटली
जखमींवर नांदेड, संभाजीनगर येथे उपचार; तीन घरांचे व तीन दुचाकींचे नुकसान

महाराष्ट्र 24 न्यूज  नेटवर्क 
हिंगोली, दि. ६ : हिंगोली शहरातील मारवाड गल्ली, चिंतामणी मंदिराजवळ फटाक्यांच्या साठ्याला लागलेल्या भीषण आगीत दोन जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेतील दोन्ही मृतांची ओळख पटली असून, विजय रामकृष्ण बासटवार (वय ७५, रा. मारवाड गल्ली, हिंगोली) आणि अविनाश काशिनाथ बांगर (वय २५, रा. वंजारवाडा, हिंगोली) अशी त्यांची नावे असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
 जखमी .नगरपालिका कर्मचारी दिलीप दोडके .
मिळालेल्या माहितीनुसार, विजय बासटवार हे ज्या घरात फटाक्यांचा साठा ठेवण्यात आला होता त्या घराचे मालक होते. तर अविनाश बांगर हा आग लागल्यानंतर ती विझवण्यासाठी घटनास्थळी गेलेला होता. घटनास्थळी त्याची मोटारसायकलही आढळून आली आहे.
दि. ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास बासटवार यांच्या घरात साठवून ठेवलेल्या फटाक्यांना अचानक आग लागली. काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केले. फटाक्यांच्या स्फोटांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. आगीच्या झळांमुळे जवळील घरांनाही मोठ्या प्रमाणात फटका बसला.
जखमी आकाश सांगळे .
या दुर्घटनेत एकूण ११ जण जखमी झाले असून, त्यांच्यावर हिंगोलीसह नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी रेफर करण्यात आल्याची माहिती आहे.
या आगीत एकूण तीन घरांचे नुकसान झाले असून, तीन मोटारसायकली जळून खाक झाल्या आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस व अग्निशमन दलाच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. आग आटोक्यात आणल्यानंतर परिसराची पाहणी करण्यात आली.
दरम्यान, या प्रकरणात फटाके विक्री व साठवणुकीच्या परवान्याबाबतही प्रश्न उपस्थित झाला आहे.जखमी रवी कांबळे .
सुरुवातीच्या माहितीत संबंधितांकडे फटाक्यांचा परवाना असल्याचे सांगण्यात आले होते; मात्र पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फटाके विक्रीचा परवाना नसल्याचे स्पष्ट झाले आहे. संबंधितांचे गांधी चौकात फटाक्यांचे दुकान असल्याची माहितीही समोर आली आहे. त्यामुळे फटाक्यांचा साठा घरात कोणत्या नियमांनुसार ठेवण्यात आला होता, याचा तपास आता पोलिसांकडून केला जात आहे.
घटनेनंतर अप्पर पोलीस अधीक्षकांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. परिसरात पोलिसांचा फिक्स पॉईंट नेमण्यात आला असून, पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. फटाक्यांचा साठा, परवाना, सुरक्षिततेच्या उपाययोजना आणि नियमांचे पालन झाले होते की नाही, याबाबत तपास केला जात आहे.
दरम्यान, रहिवासी भागात मोठ्या प्रमाणात फटाक्यांचा साठा ठेवण्यात आल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, प्रशासनाकडून अशा ठिकाणांची तपासणी करून कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने