वाढदिवसाला डीजे लावणे पडले महागात; तिघांवर गुन्हा दाखल सार्वजनिक रस्त्यावर डीजे लावून वाहतुकीस अडथळा; तिघांना पोलिसांनी घेतले ताब्यात

वाढदिवसाला डीजे लावणे पडले महागात; तिघांवर गुन्हा दाखल
सार्वजनिक रस्त्यावर डीजे लावून वाहतुकीस अडथळा; तिघांना पोलिसांनी घेतले ताब्यात

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
02ऑक्टोंबर 2026 
हिंगोली : वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी सार्वजनिक रस्त्यावर मोठ्या आवाजात डीजे लावून वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई हिंगोली तालुक्यातील राहोली खुर्द येथे करण्यात आली. संबंधित तिन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री साडेआठच्या सुमारास राहोली खुर्द येथील मारोती मंदिराच्या पाठीमागे एमआयडीसीकडे जाणाऱ्या सार्वजनिक रस्त्यावर ही घटना घडली. वाढदिवसानिमित्त आरोपींनी सार्वजनिक रस्त्यावर डीजे लावून कार्यक्रम आयोजित केला होता. त्यामुळे रस्त्यावर ये-जा करणाऱ्या नागरिकांना अडथळा निर्माण झाला तसेच वाहतुकीच्या दृष्टीने धोकादायक परिस्थिती निर्माण झाल्याचे पोलिसांच्या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणातील आरोपी गोपाल विठ्ठल घरबुडवे व आशिष केशव गरड, दोघेही रा. राहोली खुर्द, ता. जि. हिंगोली, तसेच दीपक प्रल्हाद कहऱ्हाळे, रा. डिग्रस (क.), यांनी वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी ‘बकासूर’ डीजे क्रमांक एमएच २६ ईडी ०२५५ आणि ‘देवा’ डीजे क्रमांक एमएच २० ईएल ४३८१ हे सार्वजनिक रस्त्यावर उभे केल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, जिल्हाधिकारी, हिंगोली यांनी मुंबई पोलीस अधिनियमाच्या कलम ३७ (१) (३) अन्वये जमावबंदीचे आदेश लागू केलेले असतानाही लोकांना एकत्र करून सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रम घेण्यात आल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. या प्रकारामुळे येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी राहोली खुर्द येथील पोलीस पाटील स्वप्नील किसन लोनकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात २९ सप्टेंबर २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुठे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार असलम गारवे करीत आहेत. सार्वजनिक रस्ते, वाहतूक आणि नागरिकांच्या सुरक्षिततेला बाधा निर्माण होईल अशा पद्धतीने कार्यक्रम घेणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने