मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात दाटेगाव ग्रामपंचायतीची विभागात प्रथम बाजी!तब्बल एक कोटींचे पारितोषिक जाहीर; अधिकाऱ्यांचे भव्य स्वागत करणार.मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात दाटेगाव ग्रामपंचायतीची विभागात प्रथम बाजी!

तब्बल एक कोटींचे पारितोषिक जाहीर; अधिकाऱ्यांचे भव्य स्वागत करणार.
मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड 

हिंगोली : महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या वतीने राबविण्यात आलेल्या 'मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान २०२५-२६' अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींची यादी जाहीर करण्यात आली आहे. या अभियानात हिंगोली जिल्ह्याने उल्लेखनीय यश संपादन केले असून, छत्रपती संभाजीनगर महसुली विभागातून हिंगोली तालुक्यातील दाटेगाव ग्रामपंचायतीने प्रथम क्रमांक पटकावत तब्बल एक कोटी रुपयांचे पारितोषिक मिळविण्याचा मान मिळवला आहे. या यशामुळे संपूर्ण जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

दाटेगाव ग्रामपंचायतीने गावाच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले नियोजन, लोकसहभागातून राबविलेली विविध विकासकामे, स्वच्छता, पाणी व्यवस्थापन, मूलभूत सुविधा आणि प्रशासकीय कामकाजातील प्रभावी अंमलबजावणी यामुळे विभागीय स्तरावर अव्वल स्थान मिळविले आहे. या यशामुळे दाटेगावच्या विकासकामांची दखल राज्यस्तरावरही घेतली जात आहे.

जिल्हास्तरीय पुरस्कारांमध्येही हिंगोलीची चमक

या अभियानांतर्गत जिल्हास्तरीय अत्युत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कारांमध्येही हिंगोली जिल्ह्यातील तीन ग्रामपंचायतींनी घवघवीत यश मिळविले आहे. यामध्ये हिंगोली तालुक्यातील ब्रह्मपुरी ग्रामपंचायतीने ५० लाख रुपयांचे प्रथम पारितोषिक पटकावले आहे. तर सेनगाव तालुक्यातील वरुड (चक्रपान) ग्रामपंचायतीने ३० लाख रुपयांचे द्वितीय पारितोषिक मिळविले आहे. तसेच वसमत तालुक्यातील वाई तर्फे धामणगाव ग्रामपंचायतीने २० लाख रुपयांचे तृतीय पारितोषिक प्राप्त केले आहे.

विशेष म्हणजे, विभागीय स्तरावर दाटेगावला मिळालेला एक कोटींचा पुरस्कार आणि जिल्हास्तरावरील तीन ग्रामपंचायतींचे यश यामुळे हिंगोली जिल्ह्याने ग्रामविकासाच्या क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

लोकसहभाग आणि विकासकामांना मिळाली पावती

ग्रामपंचायतींनी गावातील स्वच्छता, पिण्याच्या पाण्याचे नियोजन, जलव्यवस्थापन, सार्वजनिक सुविधा, पर्यावरण संवर्धन, ग्रामस्थांचा सहभाग आणि शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी अशा विविध क्षेत्रांत केलेल्या कामगिरीला या अभियानाच्या माध्यमातून गौरविण्यात आले आहे. ग्रामविकासासाठी प्रशासन आणि ग्रामस्थांनी एकत्रितपणे केलेल्या प्रयत्नांचे हे फलित असल्याची भावना व्यक्त होत आहे.

अधिकाऱ्यांचे भव्य स्वागत करणार

या उल्लेखनीय यशाबद्दल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी आनंद व्यक्त केला असून, पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायतींचे पदाधिकारी, ग्रामसेवक, अधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थांचे अभिनंदन केले आहे. दाटेगाव ग्रामपंचायतीच्या या ऐतिहासिक यशात योगदान देणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे भव्य स्वागत व सत्कार करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

हिंगोली जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी मिळविलेल्या या यशामुळे ग्रामीण विकासाच्या कामांना नवी ऊर्जा मिळणार असून, इतर ग्रामपंचायतींसाठीही हे यश प्रेरणादायी ठरणार आहे.

Post a Comment

أحدث أقدم