जिओ टॉवरच्या हलगर्जीपणामुळे सोडेगावकर हैराण!मोबाईल नेटवर्क आणि इंटरनेट सेवा विस्कळीत; विद्यार्थी, शेतकरी व युवा पिढीला मोठा फटका

जिओ टॉवरच्या हलगर्जीपणामुळे सोडेगावकर हैराण!

मोबाईल नेटवर्क आणि इंटरनेट सेवा विस्कळीत; विद्यार्थी, शेतकरी व युवा पिढीला मोठा फटका

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
09 नोव्हेंबर 2026
सोडेगाव : कळमनुरी तालुक्यातील सोडेगाव येथील रिलायन्स जिओ कंपनीचा मोबाईल टॉवर मागील काही दिवसांपासून व्यवस्थित कार्यरत नसल्याने गावातील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. मोबाईल नेटवर्कची समस्या, वारंवार कॉल ड्रॉप होणे तसेच इंटरनेट सेवा विस्कळीत असल्यामुळे विद्यार्थी, युवा पिढी, शेतकरी, व्यावसायिक आणि सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत.
आजच्या डिजिटल युगात मोबाईल आणि इंटरनेट ही केवळ मनोरंजनाची साधने राहिलेली नसून शिक्षण, व्यवसाय, शासकीय कामकाज, बँकिंग व्यवहार आणि दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनली आहेत. मात्र सोडेगावातील जिओ नेटवर्कच्या समस्येमुळे नागरिकांची अनेक महत्त्वाची कामे रखडत आहेत. विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण, परीक्षांची माहिती आणि अभ्यासासाठी आवश्यक असलेल्या इंटरनेट सुविधांचा लाभ घेता येत नाही. तर शेतकऱ्यांना हवामानाची माहिती, पीकविमा, ऑनलाइन नोंदणी आणि शासकीय योजनांसाठी आवश्यक असलेले व्यवहार करताना अडचणी येत आहेत.

विशेष म्हणजे युवा पिढीला ऑनलाइन शिक्षण, रोजगारविषयक माहिती, स्पर्धा परीक्षांची तयारी आणि डिजिटल व्यवहारांसाठी इंटरनेटची आवश्यकता असते. परंतु नेटवर्कच उपलब्ध होत नसल्याने तरुणांमध्येही नाराजी व्यक्त होत आहे. अनेकदा महत्त्वाचे फोन लागत नाहीत, तर इंटरनेट सुरू असूनही आवश्यक माहिती मिळत नसल्याने नागरिकांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया जात आहेत.

या गंभीर समस्येकडे रिलायन्स जिओ कंपनीच्या संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. यासंदर्भात रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेड, हिंगोली येथील व्यवस्थापकांना निवेदन देऊन सोडेगावातील मोबाईल टॉवरची तांत्रिक तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

कंपनीने तातडीने तांत्रिक अधिकाऱ्यांची नियुक्ती करून टॉवरमधील बिघाड दूर करावा आणि मोबाईल नेटवर्क, कॉलिंग तसेच इंटरनेट सेवा पूर्ववत सुरळीत सुरू करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. अन्यथा या प्रश्नाबाबत वरिष्ठ कार्यालयाकडे अधिकृत तक्रार दाखल करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

आता तरी जिओ कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सोडेगावकरांच्या समस्येची दखल घेऊन नेटवर्क सेवा सुरळीत करावी, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.

Post a Comment

أحدث أقدم