शाहूनगर, कमला नगर भागातील रस्ते कामासाठी नागरिकांचा आंदोलनाचा इशारा
हिंगोली- शहरातील नगर परिषद हद्दीतील छत्रपती शाहू महाराज नगर, कमलानगर, प्रगती नगर, कुशीनगर, सम्राट नगर, वैद्य नगर आदी भागातील रस्ते नाल्या आणि इतर नागरी समस्यांबाबत आज निवासी उपजिल्हाधिकारी यांना भेटून निवेदन देण्यात आले. तसेच येत्या १० दिवसांमध्ये या भागातील रस्त्यांचा प्रश्न न सुटल्यास आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.
छत्रपती शाहू महाराज नगर, कमलानगर, प्रगती नगर, कुशीनगर, सम्राट नगर, वैद्य नगर या भागात पक्के रस्ते ताबडतोब करण्यात यावेत, शाहू नगरातील धम्मांकूर बुद्धविहार, सामाजिक सभागृहाकडे जाण्यासाठी रस्ते तयार करून, त्याठिकाणी नगर परिषदेच्या वतीने सुशोभिकरणाची कामे करावीत, या भागात सांडपाणी व मलनिस्सारणासाठी ताबडतोब नाल्यांचे बांधकाम करण्यात यावे, या भागात नागरीक, मतदारांच्या नावाखाली गेल्या १५ वर्षामध्ये नगर विकास विभागाकडून नगर परिषदेला मिळालेल्या निधीचा सदुपयोग झाला की नाही याची शाहनिशा करण्यासाठी सर्व शासकीय योजनांच्या कामांची चौकशी करण्यात यावी आणि त्या कामांमध्ये झालेल्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात यावेत,
या भागात घंटागाडी येत नसल्याने घाण रस्त्याच्या कडेला टाकली जाते. त्यामुळे घंटागाडी सुरू करण्यात यावी, या भागातील विकास कामे न होवू देणार्या आणि हेतू पुरस्सर कामे न करणार्या नगर परिषद अधिकारी, कर्मचारी, नगरसेवक आणि पदाधिकारी यांचेवर कारवाई करण्यात यावी, या भागातील बोगस मतदार तात्काळ हटविण्यात यावेत, त्यांचेवर कारवाई करण्यात यावी या मागण्या यावेळी करण्यात आल्या.
या भागातील नागरीक भिक नव्हे तर हक्क मागत असल्याने, नगर परिषदेने वेळीच वरील मागण्यांची तात्काळ दखल घेवून येत्या १० दिवसात विकास कामे करावीत. नसता, दिनांक ०६ सप्टेंबर २०२१ रोजीपासून वरील भागातील नागरीकांच्या वतीने नगर परिषदेविरोधात आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला.
निवेदनावर आझाद समाज पार्टीचे जिल्हा प्रमुख ॲड. रावण धाबे, वंचित आघाडीचे जिल्हा संघटक रवींद्र वाढे, आझाद समाज पार्टीचे प्रदेश उपाध्याक्ष अॅड. सचिन पट्टेबहादूर, आझाद समाज पार्टीचे जिल्हा उपप्रमुख ॲड. एम. ए. सोनुले, पत्रकार सुधाकर वाढवे, भगवान गायकवाड, रमेश ठोके, संतोष होडबे, संजय जैस्वाल, बाबासाहेब वाढवे, वंचीत आघाडीचे शहर अध्यक्ष अतिखुर रहेमान आदी उपस्थित होते.
إرسال تعليق