देशात धर्म, भाषा, भक्तीमार्गाचे रुप वेगळे असले तरी आध्यात्मिक मार्ग एकच; सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
हिंगोली प्रतिनिधी
देशात धर्म, भाषा, भक्तीमार्गाचे रुप वेगळे असले तरी आध्यात्मिक मार्ग एकच आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भुमीकाही अशीच असून एक जन, एक संघ यातून मुलभुत साक्षात्कार होतो, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी बुधवारी (ता. १०) नर्सी नामदेव येथे व्यक्त केले.
सर संघचालक डॉ. भागवत यांनी आज नर्सी नामदेव येथे संत नामदेव महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले. तसेच गुरुद्वारा येथे भेट दिली. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी बोलताना डॉ. भागवत म्हणाले की, संत नामदेव महाराजांनी वारकरी संप्रदायाची पताका खांद्यावर घेऊन संपूर्ण देशभर वारकरी संप्रदायाचा प्रचार व प्रसार केला. भक्तीमार्गाने आध्यात्मिक व सामाजिकतेचे प्रतिक म्हणजे संत नामदेव महाराज असून त्यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेऊन आपण धन्य झाल्याचे त्यांनी सांगितले.
भक्तीमार्गाला भौतिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या मोठे महत्व आहे. पारंपारीक गोष्टींमधून आध्यात्म आणि सामाजिक जागृती देशात आजही दिसते. महाराष्ट्राला अनेक संतांची परंपरा लाभली आहे. संत नामदेव महाराज यांनी साध्या व सरळ भाषेत लोकांना भक्तीमार्ग सांगितला. त्यांनी पंजाबपर्यंत वारकरी संप्रदायाची पताका फडकावली. हिंदू धर्मामध्ये सामंजस्य व आत्मियता दिसून येत असल्याचे त्यांनी सांगितले.
संत नामदेव महाराजांनी सांगितलेला मार्ग पंजाबी लोकांनी स्विकारला. संत नामदेव महाराजांच्या 61 ओव्या पवित्र गुरुग्रंथसाहेब मध्ये आहेत. यावरून धर्म, भाषा, भक्तीमार्गाचे रुप वेगळे असले तरी आध्यात्मिक मार्ग एकच आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भुमीकाही अशीच असून एक जन, एक संघ यातून मुलभुत साक्षात्कार होतो असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
यावेळी जिल्हा संघ चालक तेजकुमार झांझरी, सुखबीरसिंग अलग, संदीप लासकर, ॲड. संतोष कुटे, नर्सी नामदेव संस्थानचे अध्यक्ष तथा तहसीलदार नागनाथ वागवाड, माजी नगराध्यक्ष जगजीत खुराणा, जिल्हा प्रचारक ॲड. नितीन चव्हाण यांची उपस्थिती होती
भागवत यांच्या दौऱ्या निमित्ताने अनेक प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला
إرسال تعليق