सिंदगी गावात सासु सरपंच, सुन पोलिस उपनिरीक्षक....!
महाराष्ट्र 24 न्यूज प्रतिनिधी
कळमनुरी तालुक्यातील सिंदगी या गावातील एक विवाहीत महिला गावाची पोलीस पाटील पदाहून पोलीस उपनिरीक्षक झाल्या आहेत. विशेष बाब म्हणजे, या महिलेची सासू गावाची सरपंच आहे. त्यामुळे ’सासू सरपंच तर सून पोलीस उपनिरीक्षक’ हा विषय हिंगोली जिल्ह्यात चर्चेचा विषय बनला आहे. आता त्या पोलिस उपनिरीक्षक झाल्या आहेत.
आपण अनेकदा सासू - सुनेच्या भांडणाच्या, वाद विकोपाला गेल्याच्या, संसार प्रपंचातील घटना, गोष्टी ऐकल्या आहेतचं. मात्र, ही एका सासू - सुनेची प्रेरणादायी कहाणी आहे. मुलीचं लग्न झालं की, त्यांना शिक्षणापासून वंचीत राहावं लागतं हे ग्रामीण भागातली परिस्थिती आहे. परंतू या परिस्थितीवर मात करत कळमनुरी तालुक्यातील सिंदगी गावातील एका विवाहीत पोलीस पाटील महिलेने यशाचे शिखर गाठत पोलीस उपनिरीक्षक पदापर्यंत मजल मारली आहे.
मीनाक्षी विद्याधर मगर या महिलेचा २०१३ मध्ये सिंदगी येथील विद्याधर मगर यांच्याशी विवाह झाला. विवाहानंतर त्या गावाच्या पोलीस पाटील झाल्या. त्यावेळी त्यांच्या सासू सत्वशीला मगर त्या देखील गावाच्या सरपंच होत्या. परंतू मीनाक्षी यांनी पोलीस पाटील या पदावर समाधानी न राहता एक मुलगा असताना घरीच अभ्यास करून २०१७ मध्ये झालेल्या पोलीस उपनिरीक्षक परीक्षेमध्ये यश मिळवत कुटुंबीयांची मान उंचावली आहे.
मीनाक्षी मगर या महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक येथे एका वर्षाच ट्रेनिंग घेऊन काल गावात परतल्या. त्या आल्यानंतर त्यांचे कुटुंबीय व गावकर्यांनी फटाक्यांची अतिषबाजी करत त्यांचे जंगी स्वागत केले. त्यांनी मिळविलेल्या यशाचे गावकर्यांनी सत्कार करत तोंड भरून कौतुक केले. मीनाक्षी यांच्या सासू सिंदगी गावाच्या सरपंच आहेत. त्यांचे पती कळमनुरी येथील एका खाजगी शाळेवर शिक्षक आहेत. ’सासू सरपंच तर सून पोलीस उपनिरीक्षक’ हा विषय हिंगोली जिल्ह्यात चर्चेचा बनला आहे. लग्न झाल्यानंतर सुद्धा कठीण परिस्थितीवर मात करता येऊ शकते हे मीनाक्षी मगर यांनी दाखवून दिले आहे.
إرسال تعليق