मराठा आरक्षणासाठी आखाडा बाळापुरात कडकडीत बंद बंदला उत्स्फुर्त प्रतिसाद; मराठा क्रांती मोर्चा आक्रमक, सरकारला इशारा



मराठा आरक्षणासाठी आखाडा बाळापुरात कडकडीत बंद  
बंदला उत्स्फुर्त प्रतिसाद; मराठा क्रांती मोर्चा आक्रमक, सरकारला इशारा 
महाराष्ट्र 24 न्यूज
20 ऑगस्ट 2022
हिंगोली जिल्ह्यातील आ.बाळापुर 
 मराठा आरक्षण या मुख्य मागणीसाठी मुंबईत सुरु असलेल्या उपोषणाकडे सरकारने दुर्लक्ष केले आहे. यामुळे आ.बाळापुरातील मराठा समाज आज शनिवारी आक्रमक बनला. बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आली. बंदला उत्स्फुर्त व अभुतपुर्व प्रतिसाद मिळाला. अत्यावश्यक सेवा वगळता व्यापार्‍यांनी स्वतःहुन आपली दुकाने बंद ठेवली होती. आरक्षण नाही भेटले तर इतिहासाप्रमाणे सरकारच्या विरोधात लढावे लागेल. यापुढे सरकारने आरक्षणाच्या तिढयाची सोडवणुक न केल्यास तिव्र मोर्चे काढू असा इशारा मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने देण्यात आला आहे. 

शनिवार दि.२० ऑगस्ट रोजी सकाळी आखाडा बाळापुर येथील बसस्थानकाजवळील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन वंदन करण्यात आले. यानंतर सकल मराठा समाजाच्या युवकांनी बंद आवाहन केले. यावेळी बंद मध्ये व्यापारी आपली सर्व दुकाने बंद ठेवुन सहभागी झाले. 
मुंबई येथील आझाद मैदानावर मराठा आरक्षण व इतर मागण्याकरिता दत्ता पाटील हडसणीकर यांचे आमरण उपोषण सुरु आहे. त्यांच्या उपोषणाची सरकारच्यावतीने दखल घेतल्या जात नाही. यापुर्वी मराठा समाजाच्या वतीने महाराष्ट्रात लाखोंच्या संख्येने मोर्चे काढले व मराठा आरक्षणासाठी अनेकांनी बलिदान देऊन सुध्दा शासनाकडून समाजाला न्याय मिळाला नाही. या निषेधार्थ आ.बाळापुर सकल मराठा समाज बांधवातर्फे कडकडीत बंद पाळण्यात आला. दुपारी महसुल प्रशासनाचे अधिकारी पाठक, कोकरे, रेड्डी, गोविंद भोरगे यांना आखाडा बाळापुर सकल मराठा समाजाच्यावतीने निवेदन देण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने मराठा आरक्षणाचा तिडा सोडवणुक करण्याची मागणी करण्यात आली असुन मुंबई येथील समाजा बांधवाच्या उपोषणाची दखल घेण्यात यावी, सरकारने मराठा समाजास तात्काळ आरक्षण देऊन समाजाच्या भावनाशी न खेळता त्वरित निर्णय घ्यावा अशी विनंती करण्यात आली आहे. या निवेदनाच्या प्रति उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते अजित पवार व जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. सकल मराठा समाजाचे बांधव मराठा आरक्षणावरुन बाळापुरात हजारोच्या संख्येने रस्त्यावर उतरले होते. मराठा बांधवानी एक मराठा लाख मराठा, मराठा आरक्षण आमच्या हक्काचे असा घोषणा देत सरकारला जागे करण्याचा प्रयत्न केला आहे. स्थानिक आंदोलनाची दखल घ्यावी, अन्यथा महाराष्ट्रभर लढा तिव्र करण्यात येईल असाही इशारा मोर्चेकर्‍यांनी दिला. यावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. बंद शांततेत झाला असुन या बंदमध्ये मराठा समाजाचे नेते व पदाधिकारी यांच्यासह हजारो बांधव सहभागी झाले होते. 


Post a Comment

أحدث أقدم