औंढा नागनाथ येथे चौथ्या श्रावणातील सोमवारी लाखो भाविकांनी घेतले श्री नागनाथाचे दर्शन...!



चौथ्या श्रावणातील सोमवारी लाखो भाविकांनी घेतले श्री नागनाथाचे दर्शन...!

महाराष्ट्र 24 न्यूज 
औंढा नागनाथ
श्रावणातील चौथ्या सोमवारची लाखो भाविकांनी पर्वणी साधली आणि तिर्थक्षेत्र औंढा नागनाथ येथील शिवालय गजबजून गेलं . बारा ज्योतिर्लिंगांपैकी असलेल्या तिर्थक्षेत्र औंढा नागनाथ येथील शिवालयांत राज्यासह परराज्यांतील भाविकांची मोठी गर्दी होती. पावसाची उघडीप यामुळे भाविकांत कमालीचा उत्साह होता. ’बम बम भोले’ च्या जयघोषाने औंढा नगरी दुमदुमून गेली होती.
 औंढा नागनाथ हे बारापैकी आठवे ज्योतिलिंग असलेल्या येथील नागनाथाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. राज्यासह मध्यप्रदेश, गुजरात आदी भागातील भाविकांचाही यात समावेश होता. ’बम बम भोले’ ’श्री नागनाथ महाराज की जय’च्या जयघोषाने परिसर भक्तिमय झाला होता. पार्किंगमध्ये मोठ्या प्रमाणात वाहने दाखल झाली होती.

 परिसरातील अनेक भाविक अनवाणी दाखल झाले होते. पोलीस निरीक्षक विश्वनाथ झुंजारे व देवस्थानचे व्यवस्थापक सुरेंद्र डफळ यांनी रविवारी मध्यरात्रीनंतर एकच्या दरम्यान महापूजा केली. दोन नंतर भाविकांच्या दर्शन करीता मंदीर खुले करण्यात आले. दिना पाठक, पद्माक्ष पाठक, तुळजादास भोपी, जिवन रुषी, आबागुरु बल्लाळ यांनी महापूजेची आवर्तने म्हटली. देवस्थानचे अधिक्षक वैजनाथ पवार, व्यवस्थापक सुरेंद्र डफळ, बबन सोनुने, राम देशमुख, एस जोशी, नागेश माने, कृष्णा पाटील आदी मंदिरात दिवसभर होते. महापूजेनंतर मंदिर दर्शनासाठी खुले झाले. भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या. गर्भगृहात जाऊनच दर्शन घ्यावे लागत असल्याने आणि आत जाण्या-येण्याचा एकच मार्ग असल्याने दर्शनासाठी वेळ लागत होता. तरीही भाविकांनी शांततेत श्रींचे दर्शन घेतले. संस्थानतर्फे सकाळी प्रसाद म्हणून साबुदाणा खिचडीचे वाटप केले. चौथ्या श्रावणातील सोमवारी नागनाथ मंदीरात पोलिस निरीक्षक विश्वनाथ झुंजारे यांनी कडक पोलिस बंदोबस्त ठेवला होता.


Post a Comment

أحدث أقدم