मसोड शिवारात वृद्ध पती-पत्नीचा मृतदेह आढळल्याने खळबळ
महाराष्ट्र24 न्यूज नेटवर्क
15जुलै 2024
हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील मसोड शेतशिवारात आखाड्यावर एका ज्येष्ठ दाम्पत्याचा मृतदेह १४ जुलै रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास आढळून आला आहे.
कळमनुरी तालुक्यातील मसोड शेतशिवारात गावापासून दोन किलोमीटर अंतरावर निवृत्ती सखाराम मोगले (वय ७५) यांचे शेत आहे. या शेतातील आखाड्यावर निवृत्ती मोगले यांच्यासह त्यांची पत्नी कौसाबाई मोगले (वय ७०) हे दोघेजण मागील दहा ते पंधरा वर्षांपासून शेतात राहतात, तर त्यांची मुले व कुटुंबीय मसोड गावात राहतात. दरम्यान, शुक्रवारी मोगले यांचे कुटुंबीय शेतात गेले होते. त्यानंतर, १३ जुलै रोजी शेतात कोणीही गेले नाही. दरम्यान, १४ जुलै रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास
मयत निवृत्ती मोगले यांची सून आणि नातवंडे शेतात गेले असताना, त्या ठिकाणी आखाड्यावर निवृत्ती मोगले व कौसाबाई मोगले यांचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती कळमनुरी पोलिसांना देण्यात आली, ही माहिती मिळताच, कळमनुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मोहन भोसले, उपनिरीक्षक सतीश ठेंगे, जमादार दादासाहेब कांबळे, माधव ढोकळे, सविता खिलारे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. घटनेचा पंचनामा करून पोलिसांनी दोघांचेही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कळमनुरी येथील उपजिल्हा रुग्णालयात आणले. घटनास्थळी अप्पर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व अंगुली मुद्राच्या पथकानेही भेट दिली. पुढील तपास पोलिस निरीक्षक भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे
إرسال تعليق