महिलांची फसवणूक; १०.३७ लाखांची रक्कम भरणा केलीच नाही
महाराष्ट्र24न्यूज नेटवर्क
14जुलै 2024
हिंगोली जिल्ह्यातील आ.बाळापुर
येथील भारत फायनांन्स मधील संगम व्यवस्थापकाने ४१ महिलांची १०.३७ लाख रुपयांची फसवणुक केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. या प्रकरणी आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात शुक्रवार दि.१२ जुलै रोजी रात्री उशीरा गुन्हा दाखल झाला आहे.
आखाडा बाळापूर येथील देवीगल्ली भागात भारत फायनांन्सची शाखा आहे. या शाखेकडून महिला बचतगटातील महिलांना कर्ज देऊन त्याची दर आठवड्याला वसुली केली जाते. सदर जमा झालेली रक्कम फायनांन्सच्या शाखेत भरणा करणे आवश्यक आहे. मात्र या शाखेतील संगम व्यवस्थापक पदावर असलेल्या अमोल अरुण मांजरमकर रा.बळीरामपूर, नांदेड याच्याकडे डोंगरगाव, डोंगरकडा, कुपटी, सापळी, आखाडा बाळापूर, हिवरा आदी गावे होती. या गावांत बचतगटातील महिलांना कर्ज दिल्यानंतर त्या कर्जाची आठवडी हप्त्यानुसार वसुली केली जात होती. मात्र दि.२ फेब्रुवारी २३ ते दि.७ मे २०२४ या कालावधीत जमा झालेली रक्कम त्याने शाखेत भरणा करण्या ऐवजी स्वतःसाठी वापरण्यास सुरवात केली.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच त्याची बदली झाल्यानंतर नव्याने आलेल्या कर्मचार्याने सदर गावांतून महिलांकडून आठवडी हप्ता मागितला असता महिलांनी सदर कर्जाची परतफेड केल्याचे सांगितले. त्यावरून शाखेने तपासणी केली असता ४१ महिलांची १०.३७ लाख रुपये अमोल याने स्वतःकडे ठेवून महिलांची फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी नांदेड शाखेचे अधिकारी दयानंद बोरकर यांनी शुक्रवार दि.१२ जुलै रोजी रात्री उशीरा आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी अमोल अरुण मांजरमकर याच्या विरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक विष्णूकांत गुट्टे, उपनिरीक्षक गोटके, जमादार राजीव जाधव, शिवाजी पवार पुढील तपास करीत आहेत. सेनगाव तालुक्यातही असाच प्रकार घडला असल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली असून यामध्ये १२ लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. या प्रकरणी अद्यापपर्यंत गुन्हा दाखल झाला नसल्याचे सुत्रांनी सांगितले.
إرسال تعليق