राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार गटाचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर नाशिकमध्ये उत्साहात संपन्न



राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार गटाचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर नाशिकमध्ये उत्साहात संपन्न


महत्वपूर्ण चर्चा – प्रदेशाध्यक्ष आ. शशिकांत शिंदे, माजी प्रदेशाध्यक्ष आ. जयंतराव पाटील व प्रभारी डॉ. भीमराव हत्तीअंबीरे यांची उपस्थिती

नाशिक, दि. 14 सप्टेंबर 2025:
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार गटाच्या वतीने आज नाशिक येथे भव्य कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरामध्ये राज्यभरातील शेकडो कार्यकर्ते, पदाधिकारी, युवा व महिला आघाडीचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले. पक्षाचे भविष्यातील रणनिती, संघटनात्मक बळकटी, आणि जनतेच्या मुद्द्यांवर प्रभावी भूमिका घेण्यासाठी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
शिबिराच्या प्रमुख सत्रात पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा.आ. शशिकांतजी शिंदे, माजी प्रदेशाध्यक्ष व ज्येष्ठ नेते मा.आ. जयंतरावजी पाटील, आणि प्रदेश उपाध्यक्ष तसेच नाशिक जिल्ह्याचे प्रभारी मा. डॉ. भीमराव हत्तीअंबीरे यांची विशेष उपस्थिती लाभली. या तीनही नेत्यांमध्ये आगामी निवडणूक तयारी, संघटनात्मक फेररचना, तसेच नव्या कार्यकर्त्यांना नेतृत्वाच्या संधी यावर महत्वपूर्ण चर्चा झाली.
कार्यक्रमाचे उद्घाटन करताना आ. शशिकांत शिंदे म्हणाले, "पक्षाचे विचार आणि तत्वज्ञान हे कार्यकर्त्यांच्या कृतीतून जनतेपर्यंत पोहोचायला हवे. कार्यकर्त्यांनी गावपातळीपासून ते राज्यपातळीपर्यंत संघर्षशील आणि बांधिलकीने काम करणे गरजेचे आहे."

माजी मंत्री आ. जयंतराव पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले, "आज देशात लोकशाही मूल्यांवर आघात होत असताना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हे मूल्य टिकवण्यासाठी लढत आहे. कार्यकर्त्यांनी सजग आणि सुसंगठित राहून जनतेच्या प्रश्नांना महत्व द्यावे."

शिबिराचे समारोप सत्र डॉ. भीमराव हत्तीअंबीरे यांच्या अध्यक्षतेखाली झाले. त्यांनी सांगितले की, "संघटना मजबूत करण्यासाठी प्रशिक्षण अत्यावश्यक आहे. नव्या पिढीला राजकारणात सक्रिय करून परिवर्तन घडवायचे असल्यास, त्यांना वैचारिक आणि संघटनात्मक प्रशिक्षण देणे गरजेचे आहे."

या शिबिरात विविध सत्रांमधून पक्षाचा इतिहास, संविधानिक मूल्ये, शेतकरी व कामगार प्रश्न, सोशल मीडियाचा प्रभावी वापर, आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील भूमिका यावरही मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमाचे आयोजन सुस्थितीत पार पाडण्यात आले असून, यामुळे नाशिक विभागात नव्या जोमाने पक्षकार्य सुरु होईल, असा विश्वास पक्षनेत्यांनी व्यक्त केला.

Post a Comment

أحدث أقدم