हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात गणेशोत्सवाचा उत्साह; महाआरती, महाप्रसाद व लेझीम पथकासह विसर्जन मिरवणूक
हिंगोली | प्रतिनिधी
05 सप्टेंबर 2025
हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात गणेशोत्सव मोठ्या भक्तिभावाने व जल्लोषात साजरा करण्यात आला. या प्रसंगी अँड. जी. के. गायकवाड पाटील व सौ. अर्चना गजानन गायकवाड पाटील यांच्या हस्ते श्री गणेशाची महाआरती करण्यात आली. ठाण्यातील अधिकारी, कर्मचारी व नागरिकांच्या मोठ्या उपस्थितीत आरतीचा परिसर भक्तिरसात न्हालेला दिसून आला.
या वेळी पोलीस निरीक्षक शामकुमार डोंगरे, ज्येष्ठ पत्रकार सुधाकर वाढवे, डॉक्टर बालाजी भाकरे, पोलीस उपनिरीक्षक श्रीदेवी वगे यांच्यासह ग्रामीण पोलीस ठाण्यातील अनेक अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. गणेशोत्सवाचे औचित्य साधून ठाण्यामध्ये महाप्रसादाचे भव्य आयोजन करण्यात आले होते. नागरिकांनी व पोलीस कर्मचाऱ्यांनी एकत्र येत महाप्रसादाचा लाभ घेतला.
या उत्सवानंतर लेझीम पथकाच्या पारंपरिक वादनासह श्री गणेशाची विसर्जन मिरवणूक काढण्यात येणार आहे. ढोल-ताशांच्या गजरात आणि "गणपती बाप्पा मोरया!" च्या जयघोषात गणरायाचे विसर्जन होणार असून, या मिरवणुकीसाठी पोलीस प्रशासनाकडून योग्य ती तयारी करण्यात आली आहे.
पोलीस ठाण्याच्या वतीने आयोजित हा सांस्कृतिक आणि धार्मिक उपक्रम समाजातील ऐक्य व भक्तिभावाची जाणीव करून देणारा ठरला. ग्रामस्थांनी आणि कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन हा उत्सव साजरा केल्याने पोलीस व नागरिक यांच्यातील नाते आणखी दृढ झाल्याचे चित्र दिसून आले.
إرسال تعليق