ॲड. रावण धाबे यांचा रिपब्लिकन सेनेत प्रवेश; आंबेडकरी वर्तुळात चर्चेला उधाण
हिंगोली, दि. ६ सप्टेंबर २०२५
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
हिंगोली जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ आणि आक्रमक नेतृत्व म्हणून ओळख असलेले ॲड. रावण धाबे यांनी आझाद समाज पार्टीला रामराम ठोकत रिपब्लिकन सेनेत थेट प्रवेश केला आहे. त्यांनी सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून हा निर्णय घेतल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.
या पक्षप्रवेशामुळे हिंगोलीसह मराठवाड्यातील आंबेडकरी चळवळीच्या राजकारणात मोठी खळबळ निर्माण झाली आहे.
नेतृत्वावर विश्वास, नव्या संघर्षाला सुरुवात — ॲड. रावण धाबे
पक्षप्रवेशानंतर ॲड. रावण धाबे म्हणाले, "डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची खरी तळमळ आणि दिशा जर कोणी दाखवत असेल, तर ती आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वात दिसते. चळवळीला नवचैतन्य देण्यासाठी आणि संघर्षशील नेतृत्वाची गरज ओळखून मी रिपब्लिकन सेनेत प्रवेश करत आहे."
प्रमुख नेत्यांची उपस्थिती
या पक्षप्रवेश सोहळ्याला अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. यामध्ये —
- प्राचार्य सुनीलजी वाकेकर — महाराष्ट्र राज्याचे प्रमुख नेते
- डॉ. सुशिलजी सुर्यवंशी — रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष
- किरणभाऊ घोंगडे — युवा प्रदेशाध्यक्ष
यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्थानिक राजकारणावर परिणाम
हिंगोलीसह संपूर्ण मराठवाडा परिसरात आंबेडकरी समाजात ॲड. रावण धाबे यांचा ठसा आहे. त्यांच्या या निर्णयामुळे आझाद समाज पार्टीला मोठा धक्का बसण्याची शक्यता असून, रिपब्लिकन सेनेला नवसंजीवनी मिळू शकते.
राजकीय विश्लेषकांच्या मते, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत याचा थेट प्रभाव पडू शकतो.
إرسال تعليق