सरपंचावर लाच मागणीचा आरोप खाजगी इसम ५ हजार रुपयांसह रंगेहात अटक
दि. ८ ऑक्टोबर
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
हिंगोली येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (लाप्रवि.) पथकाने आज कळमनुरी तालुक्यातील घोडा ग्रामपंचायतीचे सरपंच रावसाहेब नामदेव पाईकराव यांच्या विरुद्ध लाच मागणी प्रकरणी सापळा रचत कारवाई केली. या प्रकरणात सरपंचाचे मध्यस्थ म्हणून कार्यरत असलेल्या खाजगी इसमाला ५,००० रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले.
तक्रारीचा तपशील
तक्रारदार हा घोडा गावातील रहिवासी असून त्याच्या वडिलांच्या नावावर प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झाले होते. पहिला हप्ता मिळाल्यानंतर दुसरा हप्ता मिळवण्यासाठी संयुक्त पाहणी अहवालावर सरपंचाची स्वाक्षरी आवश्यक होती. या कामासाठी सरपंच पाईकराव यांनी खाजगी इसम सोनबा पंडितराव पतंगे यांच्या मार्फत ५,००० रुपयांच्या लाचेची मागणी केल्याची तक्रार लाप्रवि. हिंगोलीकडे करण्यात आली.
पडताळणी आणि सापळा कारवाई
६ व ७ ऑक्टोबर रोजी तक्रारीची पडताळणी करण्यात आली असता आरोपींनी तक्रारदाराकडे प्रत्यक्ष लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर आज, ८ ऑक्टोबर रोजी कळमनुरी तहसील कार्यालयाच्या समोर सापळा कारवाई राबवण्यात आली.
या कारवाईदरम्यान तक्रारदाराकडून ५,००० रुपये स्वीकारताना खाजगी इसम सोनबा पतंगे याला पंचासमक्ष रंगेहात पकडण्यात आले.
आरोपींची स्थिती
पकडलेल्या आरोपीकडून ₹१,४१० रोकड, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, ई-श्रम कार्ड आणि सॅमसंग कंपनीचा मोबाईल फोन जप्त करण्यात आला आहे. आरोपी सरपंच रावसाहेब पाईकराव हे घटनेनंतर फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.
गुन्हा दाखल
या प्रकरणी पोलीस स्टेशन कळमनुरी, जि. हिंगोली येथे भ्र.प्र. अधिनियम १९८८ चे कलम ७, ७(अ) आणि १२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू असून आरोपी पतंगे याला अटक करण्यात आली आहे.
अधिकारी माहिती
ही कारवाई राजेश मलपिलु, पोलीस निरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, हिंगोली यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या प्रकरणाचा पुढील तपास विकास घनवट, पोलीस उपअधीक्षक, लाप्रवि. हिंगोली करीत आहेत.
إرسال تعليق