बहुचर्चित पारडा खून प्रकरणातील तिन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता
हिंगोली जिल्हा व सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
10 जानेवारी 2025
हिंगोली
पारडा येथील बहुचर्चित खून प्रकरणात हिंगोली जिल्हा व सत्र न्यायालयाने दिलेल्या निर्णयाने खळबळ उडाली असून, सदर प्रकरणातील तिन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. हा निकाल दिनांक 09 जानेवारी 2026 रोजी विद्यमान जिल्हा व सत्र न्यायाधीश मा. श्रीमती एस. एन. माने यांनी सुनावला.
सविस्तर माहिती अशी की, दिनांक 13 डिसेंबर 2019 रोजी पोलीस स्टेशन बासंबा येथे फिर्यादीने तक्रार दाखल केली होती. तक्रारीनुसार, दिनांक 12 डिसेंबर 2019 रोजी आरोपींनी फिर्यादीच्या चुलत्यास शिवीगाळ करून “बायांना करणी-कवटाळ व भानामती करतो” या अंधश्रद्धेच्या संशयावरून जीवे मारण्याच्या उद्देशाने जबरदस्तीने ऑटोत टाकले. त्यानंतर रात्री 9.30 ते 11.30 या वेळेत पारडा ते बासंबा रोड दरम्यान त्यांना बेदम मारहाण करून त्यांचा खून केल्याचा आरोप करण्यात आला होता.
या तक्रारीवरून पोलीस स्टेशन बासंबा येथे गुन्हा रजिस्टर नंबर 228/2019 अन्वये भारतीय दंड संहिता कलम 302, 364, 504, 506, 34 तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम 3(2)(v) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता.
तपासादरम्यान, मयताने घटनेच्या वेळी आपल्या मुलाला फोन करून मारहाण होत असल्याची माहिती दिल्याचा दावा करण्यात आला होता. त्यासंदर्भात कॉल रेकॉर्डिंगही जप्त करण्यात आली होती. तपास पूर्ण झाल्यानंतर सदर प्रकरणात विशेष खटला क्रमांक 25/2020 अन्वये हिंगोली येथील जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.
या खटल्यात सरकार पक्षातर्फे एकूण 13 साक्षीदारांची तपासणी करण्यात आली. मात्र, साक्षीदारांचे जबाब, तांत्रिक पुरावे व परिस्थितिजन्य साक्ष यामध्ये आवश्यक ते ठोस व विश्वासार्ह पुरावे सादर होऊ न शकल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले.
सदर प्रकरणातील अटक आरोपी नागनाथ उर्फ विकास किरण गोविंदपुरे व संतोष किसनअप्पा तोरकड यांच्यावतीने ॲड. अजय (बंटी) पंडीतराव देशमुख यांनी प्रभावीपणे बाजू मांडली. आरोपींच्या बचावासाठी ॲड. सतीश देशमुख, ॲड. शामकांत देशमुख, ॲड. प्रदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सखोल युक्तिवाद करण्यात आला.
यावेळी ॲड. शरद देशमुख, ॲड. अदित ऊर्फ शुभम देशमुख, ॲड. राहुल देशमुख, ॲड. योगेश खिल्लारी (पाटील), ॲड. अविनाश राठोड, ॲड. रजत देशमुख, ॲड. प्रकाश मगरे, ॲड. मुदस्सीर अ. रहिम, ॲड. आनंद खिल्लारे, ॲड. सुमित सातव, ॲड. लखन पठाडे, ॲड. श्रद्धा जैस्वाल, ॲड. आकाश चव्हाण, ॲड. गजानन घुगे, ॲड. सुजित गायकवाड, ॲड. सुमित कदम, ॲड. तुषार देशमुख, ॲड. रुपाली खिल्लारे, शेख आदिल शेख अजीस, ॲड. तुषार पवार, ॲड. सचिन सोनुने, ॲड. संदीप डवले व ॲड. प्रिया कुरील यांनी सहकार्य केले.
दोन्ही पक्षांचा सविस्तर अंतिम युक्तिवाद ऐकल्यानंतर, सरकार पक्ष आरोपींविरुद्ध आरोप सिद्ध करण्यात अपयशी ठरल्याचे नमूद करत न्यायालयाने तिन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता केली.
या निकालामुळे पारडा व परिसरात मोठी चर्चा सुरू असून, तब्बल सहा वर्षे चाललेल्या या खटल्याचा शेवट निर्दोष मुक्ततेने झाला
إرسال تعليق