हिंगोलीत सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; ग्राहकांमध्ये नाराजी
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
03 फेब्रुवारी 2025
हिंगोली :
हिंगोली येथील सराफा बाजारात मागील काही दिवसांपासून सातत्याने वाढत असलेल्या सोन्या-चांदीच्या दरात सोमवारी अचानक मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. या अनपेक्षित घसरणीमुळे यापूर्वी उच्च दराने खरेदी केलेल्या ग्राहकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
मागील आठवडाभरात सोन्या-चांदीच्या दरात दररोज हजारोंच्या पट्टीत वाढ होत होती. विशेषतः चांदीच्या दराने विक्रमी उच्चांक गाठला होता. एका दिवशी चांदीचा दर थेट ४ लाख ५ हजार रुपये प्रति किलो इतका गेला होता, जो आतापर्यंतचा सर्वोच्च दर मानला जात होता. मात्र त्यानंतर बाजारात घसरणीला सुरुवात झाली.
गेल्या तीन दिवसांत दररोज सुमारे दहा हजार रुपयांनी चांदीचा दर कमी होत गेला. रविवारी ३ लाख ९० हजार रुपये प्रति किलो असलेली चांदी सोमवारी थेट घसरून २ लाख ५० हजार रुपये प्रति किलो झाली. म्हणजेच एका दिवसात तब्बल ४० हजार रुपयांची घसरण नोंदवण्यात आली आहे.
सोन्याच्या दरातही मोठी घट झाली आहे. काही दिवसांपूर्वी २४ कॅरेट सोन्याचा दर १० ग्रॅममागे १ लाख ७५ हजार रुपयांच्या पुढे गेला होता. रविवारी हा दर १ लाख ६१ हजार रुपये होता, तर सोमवारी तो घसरून १ लाख ५० हजार रुपये प्रति १० ग्रॅम इतका झाला.
सोमवारी हिंगोलीच्या सराफा बाजारातील दर पुढीलप्रमाणे होते —
२४ कॅरेट सोने (१० ग्रॅम) : १ लाख ५० हजार रुपये
२२ कॅरेट सोने (१० ग्रॅम) : १ लाख ४० हजार रुपये
चांदी (१ किलो) : २ लाख ५० हजार रुपये
या अचानक झालेल्या घसरणीमुळे काही दिवसांपूर्वी उच्च दराने सोने-चांदी खरेदी केलेल्या ग्राहकांना आर्थिक फटका बसल्याची भावना आहे. दररोज हजारोंनी दर बदलत असल्याने सामान्य ग्राहक संभ्रमात असून पुढील काळात बाजाराची दिशा काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सराफा व्यावसायिकांच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारातील चढ-उतार, मागणीतील घट आणि नफेखोरी यामुळे दरात ही घसरण झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
إرسال تعليق