शेतकरी पती-पत्नी बालंबाल बचावले;
वेळ आली होती, मात्र काळ नाही
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
हिंगोली | 17 जानेवारी 2026
हिंगोली–नांदेड राष्ट्रीय महामार्गावर सेल्सुरा पाटीजवळ आज सकाळी सुमारे ११ वाजताच्या सुमारास भीषण अपघात घडला. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या शेतकऱ्याच्या मोटारसायकलला मळणी यंत्र वाहून नेणाऱ्या जड वाहनाने (क्रमांक PB 06 M 8002) जोरदार धडक दिली. या अपघातात मोटारसायकलचा अक्षरशः चक्काचूर झाला असला, तरी काही क्षणांपूर्वीच मोटारसायकलवरून उतरलेल्या शेतकरी पती-पत्नीने प्रसंगावधान राखल्यामुळे ते बालंबाल बचावले.
लाशिना येथील रहिवासी शेतकरी विठ्ठल पवनकर व त्यांची पत्नी मथुरा पवनकर हे दोघे आपली मोटारसायकल (MH 38 T 5080) घेऊन शेताकडे जात होते. शेताजवळील महामार्गाच्या डाव्या बाजूला त्यांनी मोटारसायकल उभी करून खाली उतरले आणि काही अंतरावर असलेल्या शेतात जाण्यासाठी पायी निघाले. अवघ्या काही सेकंदांतच मागून भरधाव वेगात येणाऱ्या मळणी यंत्र वाहून नेणाऱ्या जड वाहनाने उभ्या असलेल्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली.
धडकेची तीव्रता इतकी जबरदस्त होती की मोटारसायकल रस्त्याच्या बाजूला फेकली गेली, तर संबंधित ट्रक अनियंत्रित होऊन पलटी झाला. या अपघातात ट्रक चालकाला गंभीर दुखापत झाली असून त्यांना तातडीने कळमनुरी येथील सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, अपघातस्थळापासून अवघ्या काही फूट अंतरावर उभे असलेले पवनकर दाम्पत्य पूर्णतः सुरक्षित राहिले.
घटनेची माहिती मिळताच हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शामकुमार डोंगरे यांच्यासह पोलीस कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी पंचनामा करून रस्त्यावरील अपघातग्रस्त वाहने बाजूला काढत वाहतूक सुरळीत केली.
पती-पत्नी सुखरूप बचावल्याचे समजताच घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
“वेळ आली होती, मात्र काळ नाही” अशी प्रतिक्रिया उपस्थित नागरिकांतून व्यक्त होत होती.
या घटनेमुळे महामार्गावरील जड वाहनांचा वेग, निष्काळजीपणा व रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनांची सुरक्षितता याबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. प्रशासनाने महामार्गावरील जड वाहनांवर वेगमर्यादा व नियंत्रण ठेवावे, अशी मागणी नागरिकांमधून जोर धरू लागली आहे.
إرسال تعليق