खटकाळी बायपास येथे चारचाकी वाहनाला भीषण आग – सुदैवाने जीवितहानी टळली
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
01 मार्च 2026
हिंगोली शहराजवळील खटकाळी बायपास परिसरात दुपारी २ वाजून ३६ मिनिटांच्या सुमारास एका गॅरेजमध्ये उभ्या असलेल्या चारचाकी वाहनाला अचानक आग लागल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात एकच धावपळ उडाली.
मिळालेल्या माहितीनुसार, खटकाळी बायपास भागातील भिसे गॅरेज येथे दुरुस्तीसाठी उभ्या असलेल्या चारचाकी वाहनातून अचानक धूर निघू लागला आणि काही क्षणातच वाहनाने पेट घेतला. आग वेगाने पसरत असल्याने उपस्थित नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली.
घटनेची माहिती मिळताच हिंगोली ग्रामीण पोलीस स्टेशन येथील पोलीस निरीक्षक श्यामकुमार डोंगरे यांनी तात्काळ पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेतली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचाऱ्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तत्काळ उपाययोजना सुरू केल्या.
दरम्यान, डॉ. बालाजी भाकरे यांनी ॲम्बुलन्ससह घटनास्थळी पोहोचून मदतकार्य केले. तसेच जळत असलेले वाहन विझवण्यासाठी खाजगी टँकरच्या मदतीने पाण्याचा मारा करण्यात आला. पोलिस आणि स्थानिकांच्या प्रयत्नांमुळे आग आटोक्यात आणण्यात यश आले.
या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. याबाबत पुढील तपास पोलीस करत आहेत.
स्थानिक नागरिकांनी पोलीस व मदत पथकाच्या तत्परतेचे कौतुक केले.
إرسال تعليق