धुलिवंदनाला गालबोट लावल्यास थेट कोठडी;
पोलीस अधीक्षक निलाभ रोहन
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
02 मार्च2026
हिंगोली : जिल्हाभरात धुलिवंदन आणि होळीचा सण दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र, या उत्साहाला अतिउत्साहाचे गालबोट लागू नये आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी हिंगोली पोलिसांनी कंबर कसली आहे. रंगाच्या नावाखाली गैरप्रकार करणाऱ्यांविरोधात थेट गुन्हा दाखल करून कोठडीची कारवाई केली जाईल, असा कडक इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे.
सण शांततेत आणि सुरक्षित वातावरणात पार पडावा, यासाठी जिल्ह्यात तगडा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. धुलिवंदनाच्या दिवशी मद्यप्राशन करून वाहन चालवण्याच्या घटना घडण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रमुख रस्ते व चौकांमध्ये ‘ब्रेथ अॅनालायझर’द्वारे विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.
गर्दीच्या आणि संवेदनशील ठिकाणी साध्या वेशातील पोलिस कर्मचारी तैनात असतील. त्यामुळे हुल्लडबाज आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे. तसेच महत्त्वाच्या चौकांमध्ये बॅरिकेडिंग करून नाकाबंदी करण्यात येणार आहे.
५९ अधिकारी, ४२२ अंमलदार रस्त्यावर
जिल्ह्यातील बंदोबस्तासाठी एकूण ५९ पोलिस अधिकारी आणि ४२२ पोलिस अंमलदार तैनात करण्यात येणार आहेत. त्यांना साथ देण्यासाठी ५१० पुरुष व महिला होमगार्ड सज्ज राहतील. याशिवाय सुरक्षेच्या दृष्टीने १ एटीएस, २ बीडीडीएस आणि आरसीपीच्या २ तुकड्या तयार ठेवण्यात आल्या आहेत. आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास एसआरपीएफच्या दोन प्लाटून पाचारण करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस प्रशासनाने दिली.
नैसर्गिक रंगांचा वापर करा; शांतता भंग केल्यास कारवाई
सणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी नैसर्गिक रंगांचा वापर करून होळी व धुलिवंदन साजरे करावे, सार्वजनिक शांततेला बाधा येईल असे कोणतेही कृत्य करू नये, असे आवाहन पोलिस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी केले आहे.
“रंगाचा बेरंग करण्याचा प्रयत्न केल्यास संबंधितांची थेट तुरुंगात रवानगी केली जाईल,” असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे.
सण आनंदात आणि सलोख्याच्या वातावरणात साजरा करण्यासाठी प्रशासन सज्ज असून, नागरिकांनीही जबाबदारीची जाणीव ठेवून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
إرسال تعليق