आईने प्रियकराच्या मदतीने मुलाचा खून; ४८ तासांत उलगडा, तिघे आरोपी ताब्यात

आईने प्रियकराच्या मदतीने मुलाचा खून; ४८ तासांत उलगडा, तिघे आरोपी ताब्यात

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
10 एप्रिल 2026
सेनगाव (जि. हिंगोली) प्रतिनिधी — सेनगाव तालुक्यातील मौजे जामदया शिवारात आढळलेल्या अज्ञात मृतदेहाच्या प्रकरणाचा अवघ्या ४८ तासांत उलगडा करण्यात स्थानिक गुन्हे शाखा, हिंगोली यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. या प्रकरणात मयताची ओळख पटवून आईसह तिचा प्रियकर आणि त्याचा साथीदार अशा तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
दि. ८ एप्रिल २०२६ रोजी जामदया ते खिल्लार मार्गालगत, प्रकाश चव्हाण यांच्या शेताजवळील नाल्यात एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. अज्ञात व्यक्तीने ओळख पटू नये या उद्देशाने डोक्यात दगड मारून खून करून मृतदेह तेथे टाकल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला होता. घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पोलीस पथक, फॉरेन्सिक टीम व डॉग स्कॉड घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक पुरावे गोळा करून सेनगाव पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
तपासादरम्यान मृतदेहावरील टॅटू व छायाचित्रांच्या आधारे सोशल मीडियावरून ओळख पटविण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यातून मयताची ओळख सचिन रामकिशन राजगुरू (रा. वढव, ता. लोणार, जि. बुलडाणा) अशी पटली. त्यानंतर पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे संशयितांचा शोध सुरू केला.
चौकशीदरम्यान रामदास विश्राम तनपुरे (वय ६५) याने धक्कादायक कबुली दिली. मयत सचिन याची आई ललिताबाई राजगुरू हिच्याशी त्याचे अनैतिक संबंध होते. या संबंधात सचिन अडथळा ठरत असल्याने त्याचा काटा काढण्याचा कट रचण्यात आला. त्यासाठी तनपुरे याने नरेश साबन्या पवार याला २५ हजार रुपये देण्याचे ठरवून खुनासाठी प्रवृत्त केले.
योजनेनुसार आरोपींनी सचिनला पाहुण्यांकडे जाण्याचे आमिष दाखवून सोबत नेले. साखरा येथे त्याला दारू पाजल्यानंतर जामदया शिवारात नेऊन डोक्यात दगड मारून त्याचा खून करण्यात आला. घटनेनंतर आरोपींनी मृतदेह नाल्यात टाकून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला.
या प्रकरणात ललिताबाई राजगुरू, रामदास तनपुरे आणि नरेश पवार या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
या गुन्ह्याचा जलद उलगडा केल्याबद्दल पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी तपास पथकाचे कौतुक केले आहे.

Post a Comment

أحدث أقدم